सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपाकडून आमदार नितेश राणे यांचे खंदे समर्थक मनीष दळवी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर यांना संधी देण्यात आली आहे. ही नावे भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुचित केली आहेत. त्यानुसार संबंधित दोघा उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया होत आहे. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु भाजप नेते राणेंनी दिलेल्या लिस्टमध्ये नितेश राणे यांचे खंदे समर्थक दळवींची वर्णी लावण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान ३१ रोजी मतमोजणी झाली होती. यावेळी भाजप अकरा तर महाविकास आघाडी आठ संचालक निवडून आले होते. त्यामुळे भाजपचे बहुमत सिद्ध झाले होते. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. केंद्रीयमंत्री नारायण राणे कोणाला संधी देतात ? याची उत्सुकता होती. त्यासाठी केंद्रीयमंत्री राणे यांनी बुधवारी सर्व संचालकांची बैठक घेतली होती. मात्र, नावे जाहीर केली होती.आज सिंधुदुर्गनगरी येथील जिखा बँक प्रधान कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सुरू झाली आहे. त्यानुसार भाजप कडून मनीष दळवी यांनी अध्यक्ष पदासाठी तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.अतुल काळसेकर यांचे अध्यक्ष पदासाठी नाव आघाडीवर होते. मात्र, नारायण राणे यांनी पुन्हा धक्कातंत्र वापरत मनीष दळवी याना संधी दिली आहे. तर अतुल काळसेकर यांना उपाध्यक्ष पदासाठी संधी दिली आहे.