कुणकेश्वर : देवगड तालुका आंबा उत्पादनाच्या बाबतीत आघाडीचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यामध्ये आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तालुक्यातील वातावरणात नुकताच बदल होऊन थोडासा थंडावा येवू लागताच काही ठिकाणी कलमांना मोहोर यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बागायतदार मनोमन सुखावला आहे. थंडीच्या प्रमाणात जर वाढ झाली तर कलम झाडांची फूट अधिक वेगाने होऊन आंबा उत्पादनात वाढ होईल असाही विश्वास काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.परतीच्या पावसामुळे भातशेती, नाचणी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. अशातच पावसामुळे आंबा उत्पादनावरसुद्धा संकट उभे होते. परंतु नुकत्याच येणाऱ्या फुटीने बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी बनावट औषधाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. औषधांचा कोणताही प्रभाव गेल्या वर्षी मोहोरावर न झाल्याने उत्पादन फार कमी झाले. यावर्षी मात्र संबंधित विभागाने अशाप्रकारच्या औषधांवर वेळीच निर्बंध घालून शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रतीची औषधे कशी पोहोचवता येतील याकडे लक्ष द्यावे अशाही सूचना बागायतदारांकडून होत आहेत. वाशी मार्केटमधील दलालांकडून आंब्याला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यासाठी शासनाने उपाययोजना करुन बागायतदारांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे. (वार्ताहर)
देवगडात आंबा कलमे मोहोरली
By admin | Updated: November 11, 2014 23:22 IST