मालवण : मालवणनजीकच्या गावातील एका युवतीच्या वडिलांशी व भावाशी झटापट करून शिवीगाळ करीत विनयभंग केल्याप्रकरणी मालवण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक लाडोबा तोडणकर यांच्यासह त्यांचा मुलगा गणेश अशोक तोडणकर व हेमंत मिठबांवकर (सर्व रा. वायरी गर्देरोड) यांना सोमवारी मालवण पोलिसांनी अटक केली. न्यायालया समोर हजर केले असता तिघांचीही जामिनावर मुक्तता केली आहे. रविवार १९ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला जात होता. याच दरम्यान तक्रारदार पीडित युवती भावासमवेत गावात होती. ती उभी असलेल्या ठिकाणी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, त्यांचा मुलगा गणेश तोडणकर व हेमंत मिठबांवकर या तिघांनीही तक्रारदार युवती, तिचा भाऊ व वडिलांशी झटापट केली. त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिचे केस ओढून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून नगराध्यक्षांसह तिघांवर मालवण पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मालवण पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली असून, याबाबत पोलीस उपनिरीक्षक डी. वाय. रणदिवे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मालवण नगराध्यक्षांना विनयभंगप्रकरणी अटक
By admin | Updated: October 21, 2014 00:39 IST