शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल

By बाळकृष्ण परब | Updated: November 22, 2024 20:31 IST

Maharashtra Assembly Election 2024: यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये कोकणाचा कौल हा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकणपट्ट्यात जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. त्यातही नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात होत असलेल्या संघर्षामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय होणार याबाबतही उत्सुकता आहे.

- बाळकृष्ण परब यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये कोकणाचा कौल हा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकणपट्ट्यात जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. त्यातही नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात होत असलेल्या संघर्षामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय होणार याबाबतही उत्सुकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील लढतींचा आढावा घेतल्यास येथे महाविकास आघाडीकडून ठाकरे गट विरुद्ध महायुतीकडून शिंदे गट आणि भाजपा अशा लढती रंगल्या. त्यात कणकवलीमध्ये भाजपा विरुद्ध ठाकरे गट तर कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशा लढती झाल्या. या लढतींमध्ये  उमेदवार कुणीही असले तरी मुख्य मुकाबला हा नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट असाच होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बाजी मारणारे नारायण राणे आपला दबदबा राखणार ही ठाकरे गट बाजी मारणार, याबाबतची उत्सुकता आहे. 

आतापर्यंत राजकीयदृष्टा संवेदशील मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेळी निवडणुकीचा प्रचार आणि मतदान अगदी शांततेत पार पडलं, हे यावेळच्या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य ठरलं. एवढंच नाही तर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीप्रमाणे मुंबईकर चाकरमान्यांनी मतदानासाठी केलेली गर्दी ही उल्लेखनीय ठरली. बुधवारी मतदानासाठी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांमधून हजारो चाकरमान्यांनी कोकणा आले होते. त्यामुळे त्यांनी दिलेला कौलही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. 

आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदासंघांचा क्रमवार आढावा घ्यायचा झाल्यास कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पारकर अशी लढत झाली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांना मोठी आघाडी मिळाली असल्याने येथून नितेश राणे सहज विजयी होतील, असं मानलं जात होतं मात्र ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांनी नितेश राणे यांना जोरदार टक्कर दिल्याचं दिसलं. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही संदेश पारकर यांनी मतदारसंघात प्रभावी प्रचार केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळेही त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यात मदत झाली. मात्र दुसरीकडे नितेश राणे हे मागच्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारसंघाची बांधणी ही बाब नितेश राणेंसाठी मतदानामध्ये फायदेशीर ठरली. त्यामुळे कणकवलीमध्ये नितेश राणे यांचं पारडं जड दिसत असून त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे.

तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात मागच्या दहा वर्षांपासून आमदार असलेले ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि  शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत असलेले नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यामध्येही अत्यंत चुरशीची लढत झाल्याचे संकेत मतदानानंतर मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघातून भाजपाला मोठी आघाडी मिळाली होती. त्यामुळे येथे महायुती ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना जोरदार टक्कर देईल, असे दावे केले जात होते. महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला सुटल्यानंतर निलेश राणेंचा शिंदे गटात पक्षप्रवेश घडवून वैभव नाईक यांच्यासमोर एक तोडीस तोड उमेदवार उभा करण्यात आला होता. त्यामुळे येथील लढत अटीतटीटी झाली. तसेच निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून या मतदारसंघातील पारडे कधी निलेश राणेंच्या बाजूने तर कधी वैभव नाईक यांच्या बाजूने झुकत असल्याचे दिसत होते. येथील कुडाळ आणि माणगाव खोऱ्यात असलेलं वर्चस्व हे वैभव नाईक यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. त्याशिवाय दहा वर्षांत आमदार म्हणून केलेलं काम तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंवर ठेवलेली निष्ठा मतदानामध्ये वैभव नाईक यांच्यासाठी जमेची बाजू ठरलीय. तर मालवण पट्ट्यात राणे समर्थकांचं असलेलं वर्चस्व आणि नारायण राणे यांनी लावलेला जोर यामुळे निलेश राणे यांनाही भरपूर मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे. मतदानानंतरची एकंदरीत परिस्थिती पाहता येथे दोन्ही उमेदवारांना विजयाची समान संधी असल्याचं दिसत आहे. तसेच अगदी किरकोळ फरकाने जय पराजयाता फैसला होईल असं दिसत आहे.  

या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत चुरशीची लढत ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात झाली. येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली अशी मुख्य लढत होती. मात्र भाजपामधील विशाल परब आणि शरद पवार गटातील अर्चना घारे परब यांनी केलेल्या बंडामुळे येथील लढत चौरंगी झाली. येथे तीन वेळचे आमदार दीपक केसरकर यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी होती. तसेच मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांवरूनही विरोधकांनी केसरकर यांना चांगलंच घेरलं होतं. मात्र व्यापक जनसंपर्क आणि समर्थकांसह नारायण राणे यांना मानणारा भाजपातील एक गट ठामपणे मागे असल्याने त्याचा फायदा हा केसरकर यांना झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे  मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच यावेळीही राजन तेली यांनी केसरकर यांच्यासमोर आव्हान उभं केलं. तसेच त्यांना भाजपमधील त्यांना मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांचीही साथ मिळाली. मात्र महायुतीच्या ताकदीसमोर त्यांचे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडल्याचे दिसले. या दोन प्रमुख उमेदवारांशिवाय भाजपात बंडखोरी करून अपक्ष  निवडणूक लढवणाऱ्या विशाल परब यांनी मतदारसंघातील तरुण मतदारांना आपल्याकडे वळवण्यात काही प्रमाणात यश मिळवल्याचं मतदाना दिवशीच्या वातावरणातून दिसलं. तर येथील चौथ्या उमेदवार अर्चना घारे परब यांनी मागच्या काही वर्षांत केलेल्या समाजकार्याच्या जोरावर मतदारसंघातील काही सर्वसामान्य मतदारांसोबत बुद्धिजीवी मतदारांचा पाठिंबा मिळवल्याचं दिसलं. सावंतवाडीतील चारही उमेदवार हे तुल्यबळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाल्याचे संकेतही मतदानादिवशीच्या वातावरणातून दिसत होते. त्यामुळे मतमोजणी वेळी केसरकर आणि तेली अशा दोघांनाही या मतविभागणीचा कमी जास्त प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र एकीकडे मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी असतानाही संपूर्ण मतदारसंघातील व्यापक जनसंपर्क, गावागावात असलेले कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेली साथ या जोरावर सावंतवाडीच्या लढतीत दीपक केसरकर यांचं पारडं किंचीत जड दिसत आहे. एकंदरीत सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अटीतटीच्या लढतीतही महायुतीच्या उमेदवारांची हवा दिसत आहे. तरीही अंतिम निकाल पुढच्या काही तासांतंच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024sawantwadi-acसावंतवाडीkudal-acकुडाळkankavli-acकणकवलीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी