गुहागर : साहित्य संमेलन साधेपणानेही करता येते आणि असे संमेलन यशस्वीही होते, हेच गुहागरच्या साहित्य संमेलनाने दाखवून दिले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे यांनी सांगत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भपकेबाजपणावर अप्रत्यक्षरीत्या टीकाच केली.गुहागर पोलीस परेड मैदान येथे उर्विमाला साहित्यनगरीत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय समोरापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी इंद्रजित भालेराव, प्रसाद पायगुडे, श्रीराम दुर्गे, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आरेकर उपस्थित होते.गुहागरातील संमेलनात तरुणांचे चैतन्य दिसून आले. संमेलनाच्या व्यासपीठालाही कोकणी टच होता. कोणताही भपकेबाजपणा नाही की मोठा गाजावाजा नाही. अलीकडे भपकेबाज साहित्य संमेलनाकडे कल वाढला आहे. मात्र, अशा संमेलनापासून दूर राहत, साधेपणाने साजरे करीतही हे संमेलन यशस्वी होऊ शकते, हे गुहागरच्या संमेलनाने सिद्ध केल्याचे बागवे म्हणाले. गुहागरमधील साहित्य गंगोत्रीप्रमाणे रसिक आणि साहित्यिकांचा याठिकाणी संगम पाहायला मिळाला, असे बागवे म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष जयदेव मोरे म्हणाले की, हे संमेलन पाहून भारावून गेलो. नगरपंचायतीनेही खांद्याला खांदा लावून या संमेलनासाठी परिश्रम घेतले. खरोखरच हे संमेलन गुहागरवासीयांच्या कायम स्मरणात राहील. अध्यक्षीय समारोपापूर्वी गुहागरच्या रम्य वातावरणात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. संतोष एरंडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
साहित्य संमेलन साधेपणातही यशस्वी होतं
By admin | Updated: December 1, 2014 00:05 IST