नका : उद्धव ठाकरे रत्नागिरी : उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका. मोठ्या प्रयत्नांती कोकणवासीयांनी फडकवलेला भगवा यापुढे उतरवू देऊ नका, अशा शब्दांत आज रत्नागिरीत विनायक राऊत यांच्या अभिनंदनासाठी आलेल्या उध्दव ठाकरे यांनी पक्षकार्यकर्त्यांना पहिल्याच वेळी सावधानतेचा संदेश दिला. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाचे संकेत मिळताच उध्दव ठाकरे रत्नागिरीत येण्याचे निश्चित झाले होते. अखेर दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ठाकरे रत्नागिरीत दाखल झाले. यावेळी भगव्या झेंड्यानिशी आणि वाद्यांसह सज्ज असलेल्या शिवसैनिकांनी मोठमोठ्या घोषणात त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाकरे म्हणाले, निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरलो. मोठमोठी भाषणे केली. मात्र, आता शब्द सूचत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. हिंदुस्थानात भगवी लाट आली आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आज पूर्ण झाले. हा विजय म्हणजे खर्या अर्थाने त्यांना समाधान देणारा असल्याचे भावनोद्गार त्यांनी काढले. ते म्हणाले, आज महाराष्ट्रभर विजय साजरा होतोय, मातोश्रीवर रांग लागली आहे. पण मी मात्र, दोन कारणांसाठी आज येथे आलोय. पहिलं म्हणजे आपलं सर्वांच दर्शन घ्यायला आणि कोकणाप्रति कृतज्ञता व्यक्त करायला. त्यामुळेच आज हा विजय मिळाला आहे. विजयाची निश्चिती कायम होती म्हणूनच मी आंगणेवाडीच्या भराडी मातेला विजयानंतर वाजतगाजत येणार, असे म्हटले होते. त्यानुसार आता माझ्या सर्व खासदारांना वाजतगाजत भराडी देवीच्या दर्शनाला नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांचे महाराष्ट्रावर भगवा फडकविण्याचे स्वप्न आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी त्यांनी प्रथमत: विनायक राऊत यांचे भगवा फेटा घालून अभिनंदन केले. पक्षप्रमुख ठाकरे यांच्यामुळेच कोकणची धुरा वाहण्याचे बळ मिळाले आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनाप्रमुखांच्या आदर्शानुसार सामान्य कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहून जनतेची सेवा करणार असल्याची ग्वाही राऊत यांनी याप्रसंगी दिली. यावेळी बाळ माने यांनीही उध्दव ठाकरे यांनाही मानाचा भगवा फेटा प्रदान करून भगव्या हाराने त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार बाळ माने, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आता भगवा फेटा उतरवू
By admin | Updated: May 17, 2014 00:11 IST