राजापूर : गेले काही दिवस राजापूर तालुक्यातील तळगाव परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पिंजरा लावून आज, मंगळवारी पहाटे जेरबंद केले . पकडण्यात आलेला बिबट्या पाच वर्षांचा असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. तालुक्यातील तळगाव मर्दवाडीत अनेक महिने बिबट्याचा मुक्त संचार वाढला होता. या परिसरातील अनेक शेळ्या त्याने मारल्या होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.सरपंच रमेश सूद यांनी तत्काळ याबाबत ग्रामपंचायतीच्या ठरावासह वनविभागाला लेखी कळवून गावात पिंजरा लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार राजापूरचे वनपाल सु. ग. गुरव यांनी चार दिवसांपूर्वी पिंजरा लावला आणि आज पहाटे बिबट्या त्यामध्ये अडकला. ही खबर ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनपाल गुरव व त्यांचे कर्मचारी विजय म्हादये, दामू गुरव, दीपक म्हादये, चव्हाण यांनी तत्काळ जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी कोंडिवड्यात एक बिबट्या फासकीत अडकला होता. (प्रतिनिधी)
तळगावमधील बिबट्या जेरबंद
By admin | Updated: October 22, 2014 00:26 IST