शिरगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व गटविकास अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांवरील नियुक्त करण्यात आलेल्या चालकांची अदलाबदल झाली आहे. चालक नियुक्तीच्या ठिकाणी राहत नसल्याबाबत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, उशिरा मिळणारी वीजबिले या विषयांवर ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक झाले. या विषयांसह विकासकामांवरही वादळी चर्चेनेच ग्रामसभेची सुरूवात झाली.ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव- शेवरेची ग्रामसभा १५ आॅगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संतोषकुमार फाटक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत आरोग्य केंद्राच्या गाडीचा चालक देवगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या गाडीवर तर गटविकास अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावरील चालक शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गाडीवरही चालकांची करण्यात आलेली अदलाबदल त्वरित रद्द करण्यात आली. त्या त्या चालकांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणीच तातडीने हजर करून घेण्यात यावे. या अदलाबदलीमुळे दशक्रोशीतील रूग्णसेवेवर परिणाम होत आहे. सध्या अदलाबदली केलेले चालक शिरगाव येथील मुख्यालयातील क्वॉटर्स उपलब्ध नसल्यामुळे राहत नाहीत. तर गटविकास अधिकारी यांच्या शासकीय गाडीवरील चालक शिरगाव येथील मुख्यालयात राहतात. सायंकाळनंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनावर चालक नाही. मूळ नियुक्तीच्या ठिकाणी चालकांना वेळीच नियुक्त न केल्यास प्रसंगी आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. वीजबिले उशिरा वितरीत करण्यात आली तर त्याचे विलंब शुल्क ठेकेदाराकडून वीजवितरण कंपनीने वसूल करावे. राकसवाडी येथील धोकादायक पिकअप शेड निर्लेखित करून नव्याने बांधण्यात यावी. शिरगाव पोलीस दूरक्षेत्र कायम सुरू ठेवण्यात यावे. येथील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. दरक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय टाळावी, अशा मागण्या करण्यात आल्या.शेवरे गावातून वाहणाऱ्या शिवगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीच्या आजुबाजूला जमिनीची धूप होत असल्याने पावसाळ््यानंतर गाळ उपसण्यात यावा. गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवी देवालय परिसरातील असलेल्या शासकीय जमिनीवर देवालयाचे पावित्र्य भंग होईल, असे कोणत्याही योजना, उपक्रम शासनाने राबवू नयेत. देवस्थान विश्वस्त समिती, बारा- पाच मानकरी यांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यात यावी. या विषयांवर वादळी चर्चा झाली. शिरगावच्या विकासकामांसाठी पालकमंत्री नारायण राणे यांनी २ कोटीचा निधी दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त समितीची नव्याने निवड करण्यात आली. या ग्रामसभेला सरपंच अमित साटम, उपसरपंच संजय जाधव, पंचायत समिती सदस्य रविंद्र जोगल, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेटये, मंगेश धोपटे, तेजश्री शेलार, स्वरूपा चव्हाण, जिल्हा बँकेच्या संचालिका सुगंधा साटम, पोलीस दूरक्षेत्र अंमलदार दीपक वरवडेकर, पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, कृषी सहाय्यक डी. डी. राठोड, तलाठी मधुकर बांदेकर, पशुधन पर्यवेक्षक डॉ. वि. के. गाडेकर, ग्रामविकास अधिकारी गणेश परब आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रिक्त पदांबाबत ग्रामस्थ आक्रमक
By admin | Updated: August 17, 2014 00:21 IST