साटेली भेडशी : शनिवार सायंकाळपासून रविवारी दुपारपर्यंत बरसणाऱ्या पावसाने भेडशी आणि परिसरातील गावातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. गेल्या महिनाभरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. सध्या परिसरातील भातशेती पिकलेली असून कापणीयोग्य झाली आहे. परंतु हाताशी आलेले पीक पावसामुळे भिजून खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सकाळच्यावेळची थंडी, दुपारचे कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस यामुळे हवामान फारच बदलले असून त्यामुळे परिसरात अनेक साथीचे रोग उत्पन्न होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने दिले आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे भेडशी येथील साप्ताहिक बाजारासाठी आलेल्या लहान-मोठ्या विक्रेत्यांची निराशा झाली. पावसामुळे बाजारही तेवढासा भरला नव्हता. त्यातच विजेचा लपंडाव सुरू होता. परतीच्या पावसाने या परिसरातील दीपावली शो टाईम कार्यक्रम रद्द करावे लागल्याने जनतेच्या उत्साहावर विरजण पडले. रविवारी सकाळी भेडशी येथील दामोदर मंदिराशेजारील कॉजवेवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली होती. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कापून वाळत घातलेले भात पावसामुळे वाया जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांमार्फत दिलेल्या शेतीकर्जात काही प्रमाणात सूट मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)
परतीच्या पावसाने लाखोंची हानी दोडामार्गला फटका
By admin | Updated: October 27, 2014 23:41 IST