दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तिलारी प्रकल्पाच्या कालव्यात अंघोळीसाठी उतरलेल्या कामगाराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी कसई-म्हावळणकरवाडी येथे घडली. मृताचे नाव बाळकृष्ण सिद्धगोविंद सोनाने (४७) रा.हुबळी कर्नाटक असे आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत बाळकृष्ण सोनाने हा कोनाळकट्टा येथील एका ठेकेदाराकडे कामास होता. सोमवारी तो एकटाच म्हावळणकरवाडी येथील तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात आंघोळीसाठी उतरला. लगतच कालव्याचे काम सुरू असल्याने दुसरे कामगार तेथे होते. आंघोळीसाठी कालव्यात उतरलेला बाळकृष्ण न दिसल्याने तो बहुधा बुडाला असावा असा अंदाज लावत दुसऱ्या कामगारांनी कालव्यात उडी घेतली व बाळकृष्ण यास बाहेर काढले. त्या कामगारांनी लागलीच बाळकृष्ण यास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले व याबाबतची माहिती येथील पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
तिलारी कालव्यात बुडून कामगाराचा मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 24, 2023 19:34 IST