खेड : ज्या वाड्यांपर्यंत गाडीचा आवाजही जात नाही, अशा ठिकाणी वसलेल्या धनगरवाड्यांपर्यंत मतांसाठी का होईना, आता राजकारणी पोहोचू लागले आहेत. या दुर्गम भागात आता राजकीय गजबज ऐकू येऊ लागली आहे. खेड तालुक्यातील ४० धनगरवाड्यांचा कल महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे राजकारण्यांची उठबस या वाड्यांवर वाढल्याचे दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांना धनगरवाड्यातील लोकांविषयी आस्था दिसून येऊ लागली आहे. अनेक वर्षे मूलभूत सोयी सुविधांपासून अलिप्त राहिलेल्या आणि पाण्यासाठी टाहो फोडून पाणी पाणी करणाऱ्या या समाजाला उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे या समाजाने कोणाला मतदान करायचे, याबाबत अजूनही निर्णय घेतला नसल्याचे या समाजातील एका पुढाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. यामुळे आता उमेदवारांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. अर्थात यामध्ये अनुभवी सूर्यकांत दळवी आणि अननुभवी संजय कदम यांची एकप्रकारे सत्वपरीक्षाच आहे़ धनगरवाड्यातील हा समाज स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यातील जीवन जगत आहे. या समाजाच्या वस्तीत आजही पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. डोंगरदऱ्यात राहात असलेला हा समाज अनेक राजकीय पक्षांची मोट घेऊन मतदान करीत आहे. मात्र, एकही पक्ष या समाजाच्या पाठीशी उभा राहाताना दिसला नाही. मार्च महिन्यापासून ते अगदी मे महिन्यापर्यंत पाणी पाणी करणारा हा समाज तहसीलदार अथवा पंचायत समितीच्या दाराशी आपली गाऱ्हाणी घालण्यापेक्षा काहीही करू शकला नाही. शिवसेनेच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत आमदार रामदास कदम यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी काही तुरळक प्रमाणात मदत केली होती. मात्र, ती फार अपुरी राहिली. काँग्रेसने तर ४० वर्षांच्या कालखंडात या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीकरिता काहीही न करता या समाजाला जैसे थे ठेवण्यात रस दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेसने तर या समाजाची घोर निराशा केली. आजवर त्यांना कोणीही पिण्याचे पाणी देऊ शकला नाही. प्रशासनाकडून टँकर दिल्यास तो वस्तीपर्यंत पोहोचू शकत नसल्याची खंत आहे. पाण्याअभावी शेळ्यामेंढ्यांसह दुभत्या जनावरांचे पालन करणे बंद करून टाकले आहे. अनेक सोयीसुविधांच्या बाबतीत हा समाज राजकीय पक्षांपासून आता दुरावला आहे. खेड तालुक्यातील रसाळगड आणि तुळशी परिसरात या समाजाची वस्ती मोठी आहे़ तालुक्याच्या चारही दिशांना हा समाज पसरला आहे़ या समाजाची उमेदवाराला निवडून आणण्याची ताकद नसली तरी पाडण्याची ताकद मात्र निश्चित आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार सध्या या दुर्गम वाड्यांवर पोहोचू लागले आहेत. (प्रतिनिधी) महत्त्वाचा असल्याने भेटीगाठी वाढल्या.खेड तालुक्यातील ४० वाड्यांचा कल महत्त्वाचा.सूर्यकांत दळवी, संजय कदम यांची सत्वपरीक्षा.पाणीसुध्दा पोहोचू शकत नसलेल्या वाड्यांवर राजकीय चर्चा.
खेड :‘त्या’ वाड्यांनाही साद
By admin | Updated: October 6, 2014 22:38 IST