मिलिंद पारकर - कणकवली -विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून कणकवलीच्या जागेसाठी खरी लढत प्रमोद जठार आणि नीतेश राणे यांच्यात मानली जात आहे. यावेळी आघाडी आणि युती तुटली असून मागील निवडणुकीप्रमाणे विभागणारी मते कोणाच्या पारड्यात जातात त्यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रासाठी यावेळी ६९.४६ टक्के मतदान झाले. २००९ मध्ये ७१.४३ टक्के मतदान झाले होते. १ लाख ४४ हजार ४८६ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यावेळी १ लाख ५५ हजार ५३८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सुमारे दहा हजार जास्तीचे मतदार आकडेवारीनुसार दिसत आहेत. मागील आणि आताच्या निवडणुकीत काही समान आणि काही वेगळे मुद्दे आहेत. भाजपाकडून आमदार प्रमोद जठार हेच यावेळी दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावून पाहत आहेत. तुल्यबळ असलेला उमेदवार म्हणजे कॉँग्रेसचा उमेदवार आहे. रवींद्र फाटक यांच्या जागी आता नीतेश राणे उभे आहेत. मागील निवडणुकीत जठार आणि फाटक यांना जवळपास समान मते पडली. त्यावेळी कुलदीप पेडणेकर हे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार जनसुराज्य पक्षातून लढले आणि त्यांना २४,५६६ मते पडली होती. तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे कुलदीप पेडणेकर यांनी कॉँग्रेसच्या उमेदवाराला पराभव दाखवला. या मतांची विभागणी कशी होते यावर विजयाचे गणित अवलंबून राहिल. शिवसेनेची मते जरी अधिकृत उमेदवाराला गेली जी मागच्या निवडणुकीत जठार यांना मिळाली होती. तरी त्याचा जठारांना फटका बसू शकतो. आता विजय सावंत यांना कुलदीप पेडणेकर यांच्या जागी पाहिले जात आहे. सावंत यांनी जुन्या कॉँग्रेसच्या मतांना आपल्या बाजूने वळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. कॉँग्रेसचा पारंपरिक मतदार हटत नसल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसते. यावेळी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार अतुल रावराणे यांच्या रूपाने उभा आहे. त्यांनाही कॉँग्रेसच्या उमेदवारासाठी संकट मानले जात आहे. मागील निवडणुकीतही काँटे की टक्कर पाहावयास मिळाली होती. यावेळीही युती आघाडीतील फुटाफुटी आणि बंडखोरीने असेच काहीसे चित्र पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
कणकवली --विभागलेली मते कोणाला ?
By admin | Updated: October 17, 2014 22:51 IST