कणकवली : उत्साहाने ७० टक्के मतदानकणकवली : विधानसभा क्षेत्रात सुमारे ७० टक्के मतदान झाले आहे. किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. ग्रामीण भागातील लोकांनी आधी मतदान मग भातकापणी असा निर्णय घेतल्याचे दिसून आले. सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढला. लोरे नं. १ येथे बोगस मतदानाचा प्रयत्न झाला. ओसरगांव येथे बूथ लावण्यावरून भाजप-कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार झाला. देवगड तालुक्यातील लिंगडाळ येथे पैसे वाटत असल्याच्या संशयावरून एकास मारहाण झाली. वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथे मतदान केंद्राबाहेर घिरट्या घालणाऱ्या ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांना पोलिसांनी समज दिली. मिलिंद पारकर ल्ल कणकवलीतालुक्यातील लोरे येथील मतदान केंद्रात (क्रमांक २३१) बोगस मतदान करण्याचा प्रयत्न एका युवकाने केला. कक्षातील मतदान एजंटांच्या हा प्रकार लक्षात येताच तो पळून गेला. हा युवक दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मतदान कक्षात आला. त्याने आपल्याकडील स्लीप दिली आणि सही केली. नाव सांगितल्यानंतर मतदान कक्षातील प्रतिनिधींना तो बोगस मतदार असल्याचे लक्षात आले. तत्क्षणी त्या युवकाने धूम ठोकली. स्वाभिमान संघटनेचा तो युवक असल्याचा आरोप शिवराज्य पक्षाचे उमेदवार डॉ.तुळशीराम रावराणे यांनी केला आहे. याप्रकरणी तेथे उपस्थित भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पोलींग एजंटनी झोनल आॅफिसरकडे तक्रार नोंदवली.ओसरगांव येथे बाचाबाचीकणकवली तालुक्यातील ओसरगांव येथे बूथ लावण्यावरून भाजपा व कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या प्रकारानंतर भाजपाचे उमेदवार प्रमोद जठार आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात जात झाला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. दोन यंत्रांत बिघाडकणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील मतदान केंद्र क्रमांक २६५ आणि बिडवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक २५३ मधील ईव्हीएम मशिनमध्ये सकाळी मतदान सुरू होतानाच बिघाड झाला. निवडणुक कर्मचाऱ्यांनी तातडीने ही यंत्रे बदलली. कणकवली विधानसभा क्षेत्रात सकाळी ७ ते ९ या टप्प्यात ७.१५ टक्के, ११ वाजेपर्यंत १६.४५ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३२.६७ टक्के, ३ वाजेपर्यंत ४३.१० टक्के तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले होते. भातकापणीचा परिणामभातकापणीचा हंगाम सुरू झाल्याने काही गावांमध्ये मतदारांनी सकाळी मतदान करून भातकापणीकडे मोर्चा वळवला. तर काही ठिकाणी आधी भातकापणी करून सायंकाळच्या वेळेत मतदान केले. वैभववाडी तालुक्यात ग्रामीण भागातील मतदार दुपारच्या आधी मतदान करून भातकापणीला गेल्याचे चित्र होते. दुपारी १२ पर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. देवगड तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांनी सकाळीच मोठ्या संख्येने मतदान केल्याने ग्रामीण भागातील टक्केवारी ७० टक्केच्या वर जाण्याची शक्यता आहे. तर शहरी मतदारांनी संथगतीने मतदान केल्याने व मतदारात लोकसभेच्या निवडणुकांइतका उत्साह न दिसल्याने टक्केवारी ६० ते ६५ टक्केच्या पोहोचण्याची शक्यता आहे.राजकारणातील वास्तवाचा वृद्ध मतदाराला आला अनुभवकणकवली : निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात आणि निवडणूक झाल्यानंतर पाठ फिरवणे हे आजच्या राजकारणात पाहावयास मिळतेच. गरज सरो वैद्य मरो ही म्हण निवडणुकीत सार्थ ठरवली जाते. असाच अनुभव बुधवारी मतदानासाठी आलेल्या एका वृद्धेला मिळाला. कणकवली तालुक्यातील लोरे येथील एका मतदान केंद्रावर एका मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका वृद्ध महिलेला मतदान करण्यासाठी वाहनात बसवून मोठ्या आशेने आणले. या महिलेला डोळ्यांनी दिसत नव्हते. त्यामुळे सोबत आलेले कार्यकर्ते मतदान कक्षात प्रवेश करू लागले. तेव्हा निवडणूक कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्या महिलेने आपणास शिवराज्य पक्षाच्या उमेदवाराला मत द्यायचे असून सहाव्या क्रमांकाचे बटण दाबायचे आहे, असे थेट सांगितले. हे वाक्य तिच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी ऐकल्यानंतर त्या वृद्धेला सोडून दिले. एकाकी पडलेल्या या वृद्धेला शेवटी शिवराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. एचपीसीएल हॉलमध्ये यंत्रेॅविद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर सायंकाळी ६ वाजल्यानंतर मतदान यंत्रे स्विकारण्यास सुरूवात झाली. त्यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. एकूण २० टेबल्स मतदान साहित्य गोळा करण्यासाठी उभारण्यात आली होती. पूर्ण पटांगणात हॅलोजन लाईटस् लावण्यात आले होते. गोळा करण्यात आलेली मतदान यंत्रे एचपीसीएल सभागृहात सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. १९ आॅक्टोबर या मतमोजणीच्या दिवसापर्यंत ही यंत्रे येथे सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रे जमा करण्याची कार्यवाही सुरू होती. 1वैभववाडी, तिथवली येथे मतदान केंद्राच्या परिसरात स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते फिरत होते. त्याबद्दल तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना वैभववाडी पोलीस स्थानकात नेले. पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी या कार्यकर्त्यांना समज देऊन सोडून दिले. 2माजी पालकमंत्री नारायण राणे, कॉँग्रेसचे उमेदवार नीतेश राणे यांनी वरवडे येथे, भाजपाचे उमेदवार प्रमोद जठार यांनी कासार्डे येथे, भाजपाचे सावंतवाडीतील उमेदवार राजन तेली आणि शिवसेनेचे कुडाळ मतदारसंघातील उमेदवार वैभव नाईक यांनी कणकवलीत मतदान केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार अतुल रावराणे यांनी वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे मतदान केले. शिवसेनेचे उमेदवार सुभाष मयेकर आणि कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार विजय सावंत यांचे नाव मुंबईत असल्याने ते मतदानापासून वंचित राहिले. मनसेचे सावंतवाडीतील उमेदवार परशुराम उपरकर हे कणकवलीत येऊ न शकल्याने मतदानापासून वंचित राहिले. 3मुणगे परिसरामध्ये एका अनोळखी पर्यटकाला मतदानासाठी पैसे वाटप करणारा समजून एका उपाहारगृहात स्थानिकांनी चौकशी केल्याने तणाव निर्माण झाला होता. ही घटना मंगळवारी रात्री घडली. मात्र हा पर्यटकच असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढील प्रसंगी टळला. लिंगडाळ येथे एका अपरिचित व्यक्तीस पैसे वाटप केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.4मतदानाचा दिवस असल्याने सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. तसेच बाजारपेठेत कोणी येणार नाही हे लक्षात घेऊन अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवला. अनेकांनी मतदानातील अनुचित प्रकारांचा विचार करत प्रवास टाळल्याने महामार्गावरील वर्दळ रोडावली होती. विधानसभा क्षेत्रात देवगड-लिंगडाळ तिठा, वैभववाडी-तिथवली, कणकवली-ओसरगांव येथील किरकोळ प्रकार वगळता या मतदारसंघातील अनुचित प्रकार टळले.आॅक्टोबर हिटमुळे दुपारची वेळ मतदारांनी टाळल्याचे दिसून आले. सकाळी ११च्या आत आणि दुपारी ४ नंतर मतदारांनी मतदान केंद्र गाठले. मतदानाचा बाजारपेठांवर परिणाम जाणवला. शिरगांवचा आठवडा बाजार बंद राहिला. तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवला. तिनही तालुक्यात निवडणुकीसंदर्भात पोलीस स्थानकात कोणत्याही स्वरूपाची तक्रार नोंद नाही.
कणकवली : उत्साहाने ७० टक्के मतदान
By admin | Updated: October 16, 2014 00:05 IST