कणकवली : वागदेतील ओम रेसिडेन्सी वसाहतीमधील घरफोडीसह विविध चोरी प्रकरणांत सहभाग असलेल्या चार युवकांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले महाविद्यालयीन युवक कणकवली परिसरातील आहेत. पोलिसांनी सुमारे तीन लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. रवींद्र जितेंद्र चव्हाण (वय २०, रा. कलमठ, गावडेवाडी), दीपक लवू गुरव (१९, तिवरे, खालचीवाडी), सौरभ प्रदीप कडुलकर (१९, रा. मठकर कॉम्प्लेक्स, कणकवली), प्रमोद भरमाणी बाळेकुंद्री (२०, रा. कलमठ, कुंभारवाडी) अशी या युवकांची नावे आहेत. यातील एकजण हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. एकाने अकरावीत, तर एकाने बारावीत असताना कॉलेज सोडले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ गॅस सिलिंडर्स, दुचाकी, तीन मिक्सर, चार टीव्ही संच, वॉशिंग मशीन, साउंड सिस्टीम, मोटरपंप, गॅस शेगडी, भिंतीवरील घड्याळे, गृहोपयोगी भांडी, फरशी कटिंग मशीन, लोखंड कापण्याचे मशीन अशा चोरीच्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मारुती ओम्नी जप्त केली आहे. चोरीचे साहित्य युवकांनी विकले होते. सिलिंडर्स प्रत्येकी अडीच हजार रुपयांना विकण्यात आली. वागदे येथील ओम रेसिडन्सी, रेल्वे स्थानक मार्गावरील साई शब्द अपार्टमेंट, बांधकरवाडीतील बंगला, कोळोशी येथील घर, जानवली येथील सापळे बागेनजीकचे घर, कणकवली गांगोमंदिरासमोरच्या इमारतीमध्ये या युवकांनी चोऱ्या केल्या. वागदे येथील ओम रेसिडेन्सी वसाहतीमध्ये तीन टप्प्यांत चोऱ्या झाल्या. चोरीतील वस्तू विकून मिळालेले पैसे हे युवक चैनीसाठी वापरत होते. चौघाही जणांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, उपनिरीक्षक मुल्ला, जे. डी. भोमकर, रविकांत अडूळकर यांनी ही कारवाई केली. या टोळीत अजून काहीजणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
कणकवलीत महाविद्यालयीन युवकांची टोळी जेरबंद
By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST