पाचल : पाचल मंडल अधिकारी कार्यालय महसूल विभागात येणारा तलाठी सजा करक अचानकपणे करक गावातून गायब होऊन त्या सजाचे दप्तर अन्य ठिकाणी नेण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार सडेतोड आवाज उठवला होता. तसेच करक सरपंच, उपसरपंच व ग्रामीण पत्रकार संघ, पाचल यांच्या प्रयत्नाने मूळ मुक्कामी तलाठी सजा पुन्हा नव्याने सुरु झाला.पाचल मंडल महसूल कार्यक्षेत्रात येणारा तलाठी सजा करक हा अचानकपणे सुमारे १० वर्षांपूर्वी मूळ ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलवला गेला. ‘तलाठी सजा करक’ असा शिक्का मात्र कायमस्वरुपी मारण्यात येत होता. अचानक गायब झालेल्या सजाच्या दप्तराबाबत कुणासही कल्पना नव्हती किंवा दप्तर हलवण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाने कोणताही लेखी आदेश दिला नव्हता. ग्रामपंचायत करक सरपंच, उपसरपंच यांनी सजा पुन्हा मूळ गावात येण्याबाबत अनेकदा प्रयत्न केले होते. परंतु त्यांना यश येत नव्हते. या प्रश्नी लोकमतनेही आवाज उठवला होता.करक गावच्या सरपंच भामिनी सुतार व उपसरपंच विलास नारकर यांनी ही बाब ग्रामीण पत्रकार संघ, पाचल यांच्याकडे कथन केली. विषयाचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पत्रकार संघाने आपली पावले उचलण्यास सुरुवात करत संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. पत्रकार संघाच्या प्रयत्नांना सरपंच भामिनी सुतार व उपसरपंच विलास नारकर यांनी सतत जोड दिली.ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकारांनी राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांच्याशी चर्चा केली. लोकमतमधून याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचा गांभीर्याने विचार करुन तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याशी केली. तलाठी सजा करकबाबतचे सर्व विषय समजून घेतल्यावर उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर व राजापूर तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी करक तलाठी सजा मूळ करक गावी हलवण्याबाबत पाचलचे श्रीकृष्ण वाजे यांना दूरध्वनीवरुन तत्काळ सूचना दिली. लगेचच वाजे यांनी करक गावी ज्या ठिकाणी तलाठी दप्तर ठेवायचे आहे, त्या ठिकाणची पाहणी करुन करक सजाचे तलाठी माने यांना करक ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेत करक तलाठी सजेचे दप्तर नेऊन ठेवण्यात यावे, अशी सूचना केली. महसूल दिनापासून तलाठी सजा करक पुन्हा नव्याने करक मुक्कामी सुरु करण्यात आले. पुन्हा नव्याने सुरु झालेल्या तलाठी सजा करक सजामुळे करक पांगरी गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
करक तलाठी सजाला मिळाली हक्काची जागा
By admin | Updated: August 3, 2014 22:46 IST