कणकवली : इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये समाविष्ट फोंडाघाट व उत्तर बाजारपेठ या महसूली गावांकरिता आयोजित जनसुनावणीत फोंडावासीयांना प्रखर विरोध दर्शविला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही जनसुनावणी झाली.सरपंच आशा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या जनसुनावणीला तलाठी मालवणकर, फोंडा वनपाल नारायण तावडे, कृषीसेवक सुवर्णा कानडे आणि ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत चौलकर उपस्थित होते. भाई भालेकर यांनी वनविभागाकडे असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रसंरक्षित असल्याने उर्वरित क्षेत्र इको झोनखाली जाऊ नये, असे मत प्रस्तावनेत व्यक्त केले.सरपंच सावंत यांनी शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांच्या विकासाच्या आड येणारा इको सेन्सिटीव्ह झोनला या सभेतून तीव्र विरोध करत असल्याचे सांगितले. तसेच जनमताचा आदर न करता इको झोन लागू केल्यास प्रखर आंदोलन उभे केले जाईल, असे सांगितले. उपस्थितांनी हात वर करून इको झोनला एकमुखी विरोधाचा ठराव केला. उद्योजक राजू पटेल यांनी इको झोनचा तोटा कसा होणार आहे हे सोदाहरण पटवून सांगितले. एकनाथ कातरूड यांनी विकास प्रक्रियेला बाधा येणार असल्याचे सांगितले. मोहन पाताडे, कुमार नाडकर्णी, अनिल हळदिवे, महेश सावंत यांनी प्रशासनाकडून इको झोनबद्दल संदिग्ध माहिती मिळत असल्याबाबत खेद व्यक्त केला. रंजन चिके यांनी इको झोनचे फायदे-तोटे याबाबत उपस्थितांना माहिती दिली. माळीणसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी वन आणि संरक्षित भागासाठी इको झोन प्रस्तावित करावा आणि विकासकामांच्या आड येणाऱ्या ठिकाणी विरोध करावा, असे मत व्यक्त केले. राजन चिके यांनी आक्षेप नोंदवत वनविभागाकडे ३७ टक्के क्षेत्र आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याने फोंडाघाटवर लादलेल्या इकोझोनला तीव्र विरोध दर्शविला. यावेळी राजन नानचे, संदेश पटेल, शेखर लिंग्रज, पिंटू पटेल, शरद तिरोडकर, बाळा माणगांवकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जनसुनावणी : एकमुखाने ठराव, प्रसंगी आंदोलनाचा निर्णय
By admin | Updated: December 29, 2014 23:36 IST