दोडामार्ग : तालुक्यात परप्रांतिय केरळीयनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिसरातील शेकडो एकर जमिन केरळीयनांच्या ताब्यात असल्याने या जमिनीत केरळीयनांनी मोठ्या प्रमाणात रबर, केळी, सुपारी आदींची लागवड केली आहे. या लागवडीच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असल्याने हे जमीन मालक केरळहून मोठ्या प्रमाणात मजूर या भागात आणीत आहेत. त्यामुळे या परप्रांतिय मजुरांची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन आज केरळीयनांच्या ताब्यात आहे. तर कित्येक एकर जमिनीवर या केरळीयनांचा डोळा आहे. या भागातील डोंगर माथ्यावरील जमिनी कमी भावाने खरेदी करून या जमिनीमध्ये रबर, केळी, सुपारी आदींच्या बागा फुलविल्या जात आहेत. यात या केरळीयनांचा सर्वाधिक कल रबर लागवड करण्याकडे आहे. डोंगर माथ्यावरील बहुतांश जमिनी केरळीयनांनी घेऊन त्यात प्लँटेशन करण्यास सुरवात केल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची कमतरता येथील केरळीयनांना जाणवत आहे. त्यामुळेच या भागात काम करण्यासाठी दररोज शेकडो केरळीयन मजुरांची ये-जा तालुक्यात वाढली आहे. या केरळीयन मजुरांची कमतरता प्रकर्षाने जाणवत असल्याने केरळीयन सावकारांनी स्थानिक युवकांना हाताशी धरून कमिशनवर मजूर पुरवणाऱ्या युवकांची एक टोळीच तयार केली आहे. या भागात कणकुंबी, मान, चंदगडसह कर्नाटकातील मजुरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या भागातील मजूर पुरविण्याचे काम स्थानिक दलाल करीत आहेत. तर केरळहून मजूर स्वत: मालक आणत आहेत. तालुक्यात केरळीयनांची संख्या जशी झपाट्याने वाढत आहे तशीच या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीलाही उस आला आहे. शिरंगे येथील जमीन वादातून तर दोन केरळीयन गटात फ्रिस्टाईल हाणामारी झाली होती. या हाणामारीत बहुतांशी केरळीयनच होते. मात्र, या केरळीयनांबाबत कोणतीही अधिकृत माहिती स्थानिक पोलिसात नसल्याने पोलिसांसमोरही तपासाचे मोठे आव्हान उभे राहीले होते. साटेली-भेडशी बाजारपेठेत तर या केरळीयनांची वादावादी नेहमीचीच ठरलेली आहे. मग ती दारूच्या नशेत असो वा आपापसातील हेवेदाव्यावरून केलेली मारामारी असो. या वादावादीचा नाहक त्रास मात्र स्थानिकांनाच सहन करावा लागतो. या भागात दाखल होणाऱ्या केरळीयनांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांच्या बाबत अधिकृ त माहिती गावातील पोलीस पाटील अथवा स्थानिक पोलीस स्थानकातही नसल्याने एखाद्यावेळेस केरळीयनांकडून गुन्हेगारीकृत्य घडलेच तर त्यांना शोधायचे कुठे हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. त्यामुळे अशा परप्रांतीय मजुरांची नोंद स्थानिक पोलीस स्थानकात करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
दोडामार्गात परप्रांतियांची संख्या वाढतेय
By admin | Updated: September 7, 2014 23:17 IST