सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याच्या कारणांमध्ये नियोजनपूर्वक करण्यात आलेली जनजागृतीचाही मोठा वाटा आहे. तसेच आगामी निवडणुकीमध्येही मतदानाच्या टक्क्यात वाढ होण्यासाठी सामाजिक संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सतीश कदम यांनी येथे केले. भारतीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीत प्रथमच सिस्टेमॅटीक वोटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्टोरल पार्टीसिपेशन (स्विप) कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता शासकीय यंत्रणा सर्व स्तरांवर प्रयत्न करीत होती. यासाठी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानद्वारे सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले ताुलक्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्ये सादर करण्यात आली. या पथनाट्याद्वारे निर्भयपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता सद्सद्विवेकबुध्दीने मतदान करण्याचे आवाहन केले. नोटाच्या बटणासंबंधी जनजागृती व पथनाट्याद्वारे केली. या पथनाट्यात सहभागी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा कौतुक सोहळा व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नुकताच येथे पार पडला. या सोहळ्यास निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार प्रीतम वाडेकर, नायब तहसीलदार शशिकांत जाधव, प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश कदम होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीणकुमार ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मतदानाबाबत जनजागरणाच्या कार्यात सहभागी करवून घेतल्याबाबत तत्कालीन प्रांताधिकारी सुषमा प्रभूखानोलकर व तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे आभार मानले. वाडेकर यांनी स्वीप कार्यक्रमाची माहिती देऊन प्रशासनास विनामोबदला मदत केल्याबाबत प्रतिष्ठानचे आभार मानले. जाधव यांनी हा पथनाट्याचा प्रयोग इतरही तालुक्यात सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी इतर उपविभागास दिल्याची माहिती देत प्रतिष्ठानच्या या कार्याचा गौरव केला. या पथनाट्यात सहभागी झालेल्या सुशांत शेजे, झिलू गावडे, ऋषभ नाडकर्णी, निकिता धुरी, स्मिताली दहिबावकर, हर्षवर्धन कांबळे, शेख शाहनवाज, साईस्वरूप देसाई व उत्कर्षा भागवत या कलाकारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, अॅन्ड्र्यू फर्नांडिस, आनंद मेस्त्री, आसीफ शेख, भगवान रेडकर, प्रशांत कवठणकर, संतोष नाईक, नीलेश माणगावकर, डॉ. मुग्धा ठाकरे आदी उपस्थित होते. सुविधा कवठणकर यांनी सूत्रसंचालन, प्रकाश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
जनजागृतीमुळे मतदार संख्येत वाढ
By admin | Updated: July 27, 2014 00:38 IST