रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागास उन्हाळी हंगामामध्ये २८ कोटी २३ लाख ७७ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ लाख २८ हजाराचे अधिक उत्पन्न मिळाले आहे. यावर्षी नऊ आगारापैकी दापोली, खेड, गुहागर, मंडणगड आगारांनी ७५ लाख ५७ हजाराचा नफा मिळविला आहे. रत्नागिरी विभागाने उन्हाळी हंगामात ७८५ गाड्या सोडल्या होत्या. ८३ लाख ६७ हजार किलोमीटर इतका प्रवास झाला होता. रत्नागिरी विभागातून दररोजच्या ग्रामीण भागातील तसेच लांब पल्याच्या गाड्या व्यतिरिक्त दररोज जादा गाड्या सोडण्यात येत होत्या. रत्नागिरी विभागातून २०१४ मध्ये १०९ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी २८ कोटी २३ लाख ७७ हजाराचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१३मध्ये २५ कोटी १५ लाख ३९ हजाराचे उत्पन्न मिळाले होते. गेली तीन वर्षे महामंडळ फायद्यात आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळातर्फे उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. गतवर्षी ८१ लाख ८८ हजार किलोमीटर प्रवास झाला होता तर यावर्षी ८३ लाख ६७ हजार किलोमीटर इतका प्रवास झाला आहे. यावर्षी दापोली आगाराने २४ लाख २३ हजार, खेड आगार १५ लाख ५ हजार, गुहागर आगारास ५ लाख २० हजार, मंडणगड आगारास ३० लाख ६४ हजार इतके जादा उत्पन्न मिळाले आहे. मात्र अन्य पाच आगाराना तोटा सोसावा लागला आहे. उर्वरित आगारांनी मात्र चांगली कमाई केली.(प्रतिनिधी)
रत्नागिरी विभागास २८ कोटीचे उत्पन्न
By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST