सिंधुदुर्गनगरी : मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी जॉली लक्झरी बसच्या चालकाकडे २०० ग्रॅम वजन असलेली सोन्याची दोन बिस्किटे व महिलांच्या कानातील, नाकातील सुमारे ८६६ सोन्याचे अलंकार असा आठ लाख ७८ हजार ७७६ रुपयांचा मुद्देमाल आढळळा. त्या सोन्याच्या अलंकारांची बिले दाखविण्यास चालक असमर्थ ठरल्याने पोलिसांनी त्याला अटक करून हे सोने जप्त केले. मनवेल डायस (वय ४७, रा. अरनेम, सालसेत, गोवा) असे चालकाचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे ६.३० वाजता ओरोस येथील जिजामाता चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. बांदा चेकपोस्ट येथे मंगळवारी साडेदहा लाखांच्या दागिन्यांसह लक्झरी चालकाला अटक करण्यात आली होती. त्या पाठोपाठ बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांना पहाटे त्यांच्या खबऱ्यांकडून मोबाईलवर माहिती मिळाली होती. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या जॉली ट्रॅव्हल्सच्या बस (जीए ०८ व्ही ९२६४) चालकाकडे संशयित माल आहे, अशी माहिती मध्यरात्री २.३० वाजता शेवाळे यांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लावला होता.पहाटे ६.३० वाजता ही बस येताच चालकाची तपासणी करण्यात आली. मात्र, प्रथम त्याच्याकडे संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. म्हणून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याची झडती घेतली असता हा मुद्देमाल सापडला. (प्रतिनिधी)व्हॅट चुकविण्यासाठीही वाहतूक?या सोन्यावरील व्हॅट कर चुकविण्यासाठी हे सोने नेण्यात येत असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे सोने आपले अथवा कोणत्या पार्टीचे किंवा सोनाराचे आहे हे तो सांगू न शकल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या पोलीस पथकात सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली अमोल बंडगर, मनीष शिंदे, विठोबा सावंत, आदींचे पथक उपस्थित होते. पॅन्टीमध्ये बिस्किटेचालकाच्या पॅन्टीच्या आतमध्ये दोन सोन्याची बिस्किटे होती. पोलिसांनी झडती घेताच १०० ग्रॅमची दोन बिस्किटे सापडली. त्याची बाजारभावाने सध्याची किंमत पाच लाख ४० हजार असून, महिलांच्या कानातले व नाकातले ८६६ अलंकार सापडले. त्याची किंमत तीन लाख ३८ हजार ७७६ रुपये आहे.
बस चालकाकडून सोन्याची अवैध वाहतूक
By admin | Updated: February 26, 2015 00:07 IST