सावंतवाडी : धोकादायक झालेल्या विद्युत खांबांच्या दुरुस्तीकडे, बदलण्याकडे व झाडाझुडुपांनी वेढलेल्या विद्युत खांबांची साफसफाई करण्याकडे महाराष्ट्र विद्युत महामंडळाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र सावंतवाडीत काही ठिकाणी दिसत आहे. जीर्ण झाल्याने धोकादायक बनलेल्या विद्युत खांबांमुळे हानी झाल्यास याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ घेईल का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. जीर्ण झालेले खांब बदलून योग्य ती काळजी घेत वीज वितरण मंडळाने सतर्कता बाळगावी, अशी मागणीही होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील काही ठिकाणचे विद्युत खांब हे जमिनीकडील बाजूने गंजलेले आहेत. यामुळे वीज खांब मोडकळीस आलेले आहेत. पावसाळ्यात महामंडळाचे लक्षावधीचे नुकसान ठरलेलेच असते. परंतु याला काहीअंशी विद्युत कंपनीही कारणीभूत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. विद्युत उपकरणांच्या जवळपास वाढलेल्या झाडांच्या फांद्या, धोकादायक झाडे तोडली जात नाहीत. जुने, जीर्ण, मोडकळीस आलेले धोकादायक खांब दुरुस्त करणे किंवा आवश्यक असल्यास बदलणे गरजेचे असते. परंतु खांब पूर्णपणे मोडून पडल्याशिवाय विद्युत महामंडळाला जाग येत नाही. वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळेच मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तुटलेल्या तारा न बदलता जुन्या तारांचे जोडकाम करून तात्पुरती गरज भागविली जाते. जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्यास त्यालाही जोडणी देत तारा बदलल्या जात नाहीत. यामुळे वीज गळतीत वाढ होते तसेच तारा तुटण्याचीही भीती नागरिकांच्या मनात राहते. पावसाळ्यात विद्युत कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबत असतात. मात्र, अपघाताचा धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहून पावसाळ्यापूर्वी विद्युत तारा, खांब आणि अन्य उपकरणांची पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. विद्युत खांब, तारा, उपकरणे यांच्याजवळ वाढलेली झाडे, वेली तोडून साफ केल्या पाहिजेत. जुने, जीर्ण खांब, तारा बदलणे गरजेचे आहे. महत्वाच्या विद्युत जनित्रांची दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व भागातील विद्युत खांबांचे व तारांचे सर्वेक्षण करण्यात यावे व तुटलेल्या तारा बदलण्यात याव्या व गंजलेले, मोडकळीस आलेले खांब बदलावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)समस्यांकडे डोळेझाकसावंतवाडीतील न्यू सबनीसवाडासह अन्य भागातील खांब जीर्ण झालेले आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मरच्या खांबांवरही काही ठिकाणी वेलींनी घर केले आहे. यामुळे विद्युत पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या छोट्या छोट्या गोष्टींकडे वीज वितरणचे दुर्लक्ष होत राहिल्यानेच मोठी घटना घडते.
गंजलेल्या खांबांकडे वीज वितरणचे दुर्लक्ष
By admin | Updated: September 7, 2014 00:36 IST