रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आर्किटेक्चर तसेच मेरिटाईम कोर्सेस आवश्यक आहेत. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम आणण्याचा विचार आहे. मात्र, या अभ्यासक्रमांची महाविद्यालये उघडताना दुसऱ्या महाविद्यालयाच्या मुलांवर परिणाम होणार नाही, हाही विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठीच हे योग्यरित्या नियोजन करावे लागणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.डॉ. देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राला आज पहिल्यांदा सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी शैक्षणिक क्षेत्रातील बदलाबाबत तसेच अडचणींबाबत चर्चा केली. डॉ. देशमुख यांच्या हस्ते विद्यापीठ उपकेंद्राच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये बैठका घेतल्या. जवळपास ५५० प्राचार्यांना भेटलो. त्यांच्याशी अभ्यासक्रम, समस्यांबाबत चर्चाही केली. या दरम्यान अनेक बाबी समोर आल्या. विद्यार्थी केंद्र मानून विविध कार्यक्रम घेतले जावेत. त्यात शिक्षकांचा सहभागही गरजेचा असून, प्राचार्यांशी थेट संपर्क असणे, ही बाबही महत्त्वाची असणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात ‘बेस्ट टीचर’ निवडले जावेत, अशी संकल्पना राबवण्याचा मानस आहे, त्यायोगे विद्यार्थ्यांना कुठला शिक्षक उत्कृष्ट वाटतो, हे कळेल. ते म्हणाले, दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थीसंख्या आणि आकारले जाणारे शुल्क, हे माझ्या दृष्टीने शिक्षणासाठी असलेले निकष नाहीत तर माझा प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभा कसा राहू शकेल, तो ज्ञानाचा उपयोग समाजात कशासाठी करेल, हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. विद्यापीठ वर्धापनदिनाचे औचित्य साधून विविध तज्ज्ञांच्या व्याख्यानमाला सुरू करणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, माझी जास्त भिस्त सोशल मीडियावर आहे. कोकणातील मुलेही आता स्पर्धा परीक्षांना सामोरी जात आहेत. त्यादृष्टीने त्यांच्यासाठी डिजिटल पुस्तके उपलब्ध करून देण्याचा विचार असून, त्यासाठी डिजिटल लॉकर्स संकल्पना राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे आपण प्राचार्यांच्या विभागवार बैठका घेणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील प्राचार्यांना सोयीचे ठिकाण असलेल्या ठिकाणी बैठका होतील, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. (प्रतिनिधी)
आर्किटेक्चर, मेरिटाईम अभ्यासक्रमांचा विचार
By admin | Updated: July 16, 2015 22:56 IST