कणकवली : तालुक्यातील वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात एक हजार पालक तसेच विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा, तबला, हार्मोनियम, ढोलक, मृदंग, टाळ, हलगी, दिमडी, सिन्थेसायजर, संबळ यासह शेकडो वाद्ये सलग एक तास वाजवून संगीत विश्वातील एक नवा विक्रम केला. या उपक्रमाच्या निमित्ताने एकाचवेळी हजार वाद्यांचे गुंजन लक्षवेधी ठरले. दरम्यान, या उपक्रमाची नोंद ग्लोबल रेकॉर्ड अँड रिसर्च फाउंडेशनकडे झाली असून विक्रम करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यानिमिताने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. राष्ट्रीय विज्ञान दिन व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम जयंतीचे औचित्य साधून आयडियल इंग्लिश मेडीयम स्कूल,सोमस्थ अकादमी कणकवली आणि सिंधुगर्जना ढोल ताशा पथक यांच्या विद्यमाने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 'हम होंगे कामयाब', 'मेरा जुता है जपानी', 'हे राष्ट्र देवतांचे ', 'बलसागर भारत होवो' ही गाणी विद्यार्थ्यानी गात वातावरण देशभक्तिमय केले. पालक व विद्यार्थ्यांनी ताशा, ढोल, तबला, हार्मोनियम, ढोलकी ,टाळ आदी वाद्ये एकाचवेळी वाजवून आसमंत निनादून सोडले. ज्ञानदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, नीलेश महिंद्रकर, डी. पी. तानावडे, शीतल सावंत, सावी लोके, राजेश शिर्के, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, अशोक करंबेळकर, पत्रकार गणेश जेठे, महेश सावंत, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात खारेपाटण विद्यालय, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २, जिल्हा परिषद शाळा कलमठ, डिगस हायस्कूल, आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.