महेश सरनाईक - कणकवली -विधानसभा निवडणूक आता २२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अजून आघाडी, युतीबाबत थांगपत्ता नाही. मात्र, आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आशेने संभाव्य उमेदवारांनी जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. सिंधुदुर्गात असलेल्या तीन मतदारसंघात सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघात लक्षवेधी लढत असल्याने प्रचारामध्ये मोठी चुरस निर्माण होत आहे. त्यातच या दोन्ही मतदारसंघात बाहेरून जाऊन लढणारे उमेदवार असल्याने या उमेदवारांनी आपण स्थानिक असल्याबाबत नामी शक्कल लढवून त्या-त्या मतदारसंघात घरे घेऊन तेथेच बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रचाराचा हा नवा फंडा असल्याचेही बोलले जात आहे.मतदारसंघात उमेदवार हा त्या भागातला प्रतिनिधी असेल तर त्याला जास्त लोकांची पसंती असते, हे सार्वत्रिक सूत्र आहे. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात काम करत असताना ‘जवळची व्होकाल कुरडी’ (जवळची नवरी कुरुप म्हणजे चांगली नाही.) या मालवणी म्हणीच्या प्रत्ययाप्रमाणे आपण आपल्या मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिलो तर आपल्याला तेवढी पसंती मिळणार नाही. त्यामुळे जर दुसऱ्या मतदारसंघात राहिलो तर आपण मोठे मताधिक्य मिळवू शकतो म्हणून की काय कणकवलीतील माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघाची निवड केली आहे.राजन तेली आणि परशुराम उपरकर या दोघांनीही सध्या सावंतवाडीत मुक्काम ठोकला आहे. असे म्हणतात की, त्यांनी तेथे घरेच खरेदी केली आहेत. म्हणजे गेले महिनाभर ही नेतेमंडळी सावंतवाडीत ठाण मांडून आहेत. या मतदारसंघात माजी आमदार व शिवसेनेत प्रवेश केलेले दीपक केसरकर हे सावंतवाडीतीलच आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान उभे करायचे असेल तर सावंतवाडीत राहिल्याशिवाय पर्याय नाही. या सूत्रामुळे या दोघाही उमेदवारांनी सावंतवाडीत राहणे पसंत केले आहे.दुसरीकडे कुडाळ मालवण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी मालवणात मुक्काम केला आहे. त्यांनीही मालवणात राहून कुडाळ-मालवणमध्ये प्रचाराचा धुरळा उडवायला सुरूवात केली आहे. वैभव नाईक यांचे निवासस्थान कणकवलीत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही परतालुक्याचा शिक्का बसू शकतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी गेले दोन महिने मालवणातच मुक्काम ठोकला आहे. त्यांना गेल्या सहा निवडणुका मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नारायण राणे यांच्याशी टक्कर द्यायची आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण मतदार संघ ढवढून काढण्यासाठी कणकवलीतील घरात मुक्काम करून काहीच साध्य होणार नसल्याने ते मालवणात तळ ठोकून बसले आहेत.एकंदरीत जरी या उमेदवारांनी त्या-त्या भागात राहून आपण ‘लोकल’ असल्याचा बुरखा घेतला असला तरी प्रत्यक्षात मतदारराजा कोणाला पसंती देतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.मुक्कामी दौऱ्यांचे प्रमाण वाढले...!कणकवली मतदारसंघात नितेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांच्यात सरळ लढत होणार आहे. अपक्ष म्हणून काँग्रेसचे आमदार विजय सावंत आणि राष्ट्रवादीचे कुलदीप पेडणेकर रिंगणात उतरण्याची शक्यता असली तरी खरी लढत राणे विरूद्ध जठार यांच्यातच होणार आहे. जठार प्रत्येक गावात प्रचार यंत्रणा राबवित आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. मात्र, नितेश राणे या तिन्ही मतदारसंघात बुजुर्गांच्या तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या काही संकल्पना लोकांसमोर मांडण्यासाठी प्रचारातील काही दिवस वैभववाडी, देवगडमध्ये मुक्कामही करत आहेत.
घर इथे अन् उमेदवारी तिथे
By admin | Updated: September 24, 2014 00:09 IST