मालवण : जिल्ह्यातील उपक्रमशील पंचायत समिती असणाऱ्या मालवण पंचायत समितीने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता आणण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तम प्रशासक व उपक्रमशील अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती सदस्यांनी आतापर्यंत सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यावर झालेली कार्यवाही यांची माहिती संकलित करून एका क्लिकवर उपलब्ध होणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे पंचायत समिती सदस्यांना त्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अंमलबजावणीची माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे पंचायत समिती सदस्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या सॉफ्टवेअरची प्राथमिक झलक पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत सदस्यांसमोर दाखविण्यात आली. यात सदस्यांनी आजपर्यंत उपस्थित केलेले प्रश्न व त्यांची कार्यवाही याबरोबरच जिल्हा व राज्य पातळीवर प्रलंबित असणारे प्रश्नही दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे सदस्यांना पाठपुरावा करताना त्याचा फायदा होणार आहे.अनेक विभागांशी संबंधित असलेले ५०० ते ६०० प्रश्न गेल्या अडीच वर्षात सदस्यांनी मांडले. संबंधित प्रश्न त्या विभागांकडे पाठवून त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलित करण्यात आली आहे. यामुळे सदस्य या विभागाकडे जावून झालेल्या कार्यवाहीचीही माहिती घेऊ शकतात. सदस्यांना देण्यात आलेले टॅब याबाबतची माहिती आॅनलाईन मिळणार आहे. सर्व ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा घेण्याबाबतही ग्रामसेवकांकडून कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांना कोणत्याही ग्रामपंचायतीत जावून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर झालेल्या कार्यवाहीची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी शासनाच्या सर्व योजनांचीही माहिती आॅनलाईन पद्धतीने सदस्यांना उपलब्ध करून दिली होती. तसेच प्रस्ताव सादर करण्यासाठी करायची कार्यवाहीचीही माहिती दिली होती. जेणेकरून सदस्यही बदलत्या काळाबरोबर आॅनलाईन सेवेचा फायदा घेऊ शकतील व आपल्या भागातील लोकांनाही याची माहिती तातडीने उपलब्ध करून देऊ शकतील. (प्रतिनिधी)
पंचायत समिती बनली हायटेक
By admin | Updated: November 5, 2014 23:33 IST