सावंतवाडी : युवती अत्याचार प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, याबाबत तिच्याच आईने हात झटकले असून, मुलीचा आणि माझा काहीही संबंध नाही, असे सांगत तिला स्वीकारण्यासही नकार दिला आहे. युवतीच्या जबाबावरूनही आता तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. सोमवारी ‘इन कॅमेरा’ जबाब घेण्यात आला, त्यावेळी अंकुर केंद्राच्या अधीक्षिका तसेच महिला अत्याचार समितीच्या सदस्या उपस्थित नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. याबाबत पोलीस उपअधीक्षक खरात यांना विचारले असता, लेखी द्या, आम्ही खात्री करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. युवतीच्या आईने स्वत:च्या हस्ताक्षरात एक पत्र जाहीर केले असून, यात आपल्या मुलीने यापूर्वी अनेक ठिकाणी चुकीचे मार्ग पत्करले आहेत. त्यामुळे मी तिला वैतागले होते, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, ही युवती आपल्या नातेवाईकांकडे सावंतवाडीत राहत होती. त्यांच्या घरातील युवक अमित मोर्ये याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर तिचे ज्या युवकाशी प्रेमसंबंध होते, त्याच्याशी ती विवाह करण्यासाठी गेली होती. त्या युवकावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही युवती आरेकर कॉलनीमध्ये राहत होती. त्यांच्या घरातील दोन युवकांची नावे घेतल्याने त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. नंदकिशोर गावडे हा त्यांचाच नातेवाईक असल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणात नातेवाईकच आरोपी बनल्याने सर्वजण हादरून गेले आहेत. युवतीसोबत आंबोलीला गेलेल्यांची चौकशी होणार गेल्या रविवारी या युवतीसोबत शहरातील काही युवक तसेच काही युवती आंबोली येथे गेल्या होत्या. तेथे मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर झाल्याची चर्चा सावंतवाडीत जोर धरत असतानाच हे प्रकरण मिटविण्यात आले. यात युवतीसोबत सावंतवाडीतील नेहमीच्या वावरातील युवती व युवक होते. हे युवक अनेक वेळा ती राहत असलेल्या खोलीत ये-जा करीत असत. त्यामुळे त्यांचीही चौकशी होणार आहे. कणकवली, फोंडा येथील तक्रारींची खातरजमा युवतीवर कणकवली व फोंडा येथे तक्रारी आहेत, अशी माहिती आमच्याकडे नाही. पण तशी तक्रार असल्यास आम्हीत्याची खातरजमा करू. तसेच तपासात घाई करणार नाही. फेसबुक व व्हॉॅटस् अॅपची मदत घेणार असल्याचे यावेळी पोलीस उपअधीक्षक खरात यांनी पत्रकारांंशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
त्रुटी असल्यास लेखी द्या आम्ही सध्या याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल केले असून तपासात निश्चितच प्रगती होणार आहे. त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक विजय खरात यांनी दिले आहे. तसेच कोणाला जबाबात त्रुटी वाटत असल्यास त्यांनी लेखी द्यावे, आम्ही खातरजमा करण्यास तयार आहोत. तुम्ही आम्हाला माहिती द्या, असे पत्रकारांशी बोेलताना विजय खरात यांनी सांगितले.