कणकवली : सत्तेत आलेल्या भाजप शासनाकडून गिरणी कामगारांवरही अन्यायच केला जात आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नांवर गिरणी कामगार कृती संघटनेच्यावतीने अनेक लढे उभे करून शासनाचे लक्ष वेधले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांना गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळच नाही. यामुळे शासनाच्या विरोधात तीव्र लढा द्यावा लागेल. त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी गिरणी कामगारांनी सज्ज व्हावे, असे आवाहन गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी केले. टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या सभागृहात बुधवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. सेंच्युरी मिलचे नंदू पारकर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सुनील बोरकर, अण्णा शिर्सेकर, दिनकर मसगे, कमलताई परुळेकर, आदी उपस्थित होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ जुलैला सकाळी १० वाजता मुंबईच्या राणीबाग येथून विधानभवनावर गिरणी कामगारांचा लाँग मार्च आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गिरणी कामगारांचे मेळावे घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कणकवली येथे हा मेळावा आयोजित केला होता. गिरणी कामगारांसाठी बांधून तयार असलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे मिळण्याचा जो हक्क कायद्याने प्राप्त झाला आहे, त्याची अंमलबजावणी करा, एक लाख ४० हजार कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत, १६ गिरण्यांच्या म्हाडास दिलेल्या जमिनींवर त्वरित गिरणी कामगारांच्या घराचे बांधकाम सुरू करावे, बांधून तयार असलेल्या घरांची लॉटरी काढावी, या मागण्यांसाठी सर्व गिरणी कामगारांनी एकत्रितपणे मुंबईत धडक द्यायची आहे. या मोर्चामध्ये बहुसंख्येने गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इस्वलकर यांनी केले. परुळेकर म्हणाल्या, ‘अच्छे दिन’ आयेंगे म्हणत शासनाने गरिबांना नाहीसे करण्याची धोरणे जाहीर करायला सुरुवात केली आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने लोकांनी इच्छा मनात बांधल्या होत्या. त्या तशाच राहिल्या आहेत. यामुळे अच्छे दिनाची हवाच गेली आहे. आता गिरणी कामगारांनी भूलथापांना बळी न पडता १५ जुलैच्या लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. सुनील बोरकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिनकर मसगे यांनी तर आभार सुदीप कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)
शासनाला जाग आणण्यासाठी सज्ज व्हा
By admin | Updated: July 10, 2015 22:03 IST