सिंधुदुर्गनगरी : सागरी किनारा स्वच्छता मोहिमेंतर्गत २६ मे रोजी जिल्ह्यातील ३४ सागर किनारे व सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांकडून स्वच्छता राखली जावी तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तनात व पोषाखात योग्य ते तारतम्य पाळले जावे यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.सागरी किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वच्छता व पाणी मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत २६ मे रोजी वेंगुर्ले, मालवण व देवगड तालुक्यातील ३४ सागर किनारे व सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ६१ किलोमीटर अंतराच्या या किनारपट्टीसाठी ३६ ठिकाणी नोडल आॅफिसरांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महसूल कर्मचारी, पंचायत समिती, नगरपंचायत कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ, मंडळे यांचा सहभाग होणार आहे. या अंतर्गत सुका कचरा, ओला कचरा, प्लास्टिक कचरा व काचेच्या बाटल्या याचे विलगीकरण करण्यात येणार आहे. गोळा केलेला कचरा वेंगुर्ला नगरपालिकेच्या स्वच्छता प्रक्रिया यंत्राद्वारे निर्गत केला जाणार आहे. यासाठी यूएनडीपीमार्फत स्वच्छता दुतांसाठी टी-शर्ट, टोपी, हॅण्डग्लोव्हज्चा पुरवठा करण्यात आला आहे. ही स्वच्छता मोहिम सकाळी ७ ते ९ या वेळेत राबविली जाणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.पावसाळी पर्यटनात अति उत्साही पर्यटकांना बंधने घालण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोषाख कसा असावा तसेच वर्तन शिस्तीचे असावे ज्यामुळे पर्यटनस्थळी कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांना धास्ती वाटणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. पर्यटनस्थळी स्वच्छता ठेवावी यासाठी कडक निर्बंध घातले जाणार आहेत. पावसाळी पर्यटन व त्यानंतरही जिल्ह्यात येणारे पर्यटक बिनधोक सर्वत्र जावू शकतील यासाठी पोलिसांची मदतही घेतली जाणार असल्याचे अनिल भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोहिम सुरू ठेवणार : सिंहसिंधुदुर्गातील विविध पर्यटनस्थळांवरील साफसफाई व स्वच्छता कायम रहावी यासाठी भविष्यात अशी स्वच्छता मोहिम दोन ते तीन महिन्यांनी घेतली जाणार आहे. त्यावेळी शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला जाईल असे शेखर सिंह यांनी सांगितले.
अतिउत्साही पर्यटकांना लगाम
By admin | Updated: May 25, 2016 00:24 IST