मालवण : सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांसह सिंधुदुर्गातील सर्वच किल्ल्यांच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मालवण-कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत केली.पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांची तटबंदी ढासळत चालली असून, विजयदुर्ग किल्ला हा ८०० वर्षांपूर्वीचा जुना आहे, तर सिंधुदुर्ग किल्ल्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यात लहान-मोठे ३१७ किल्ले असून त्यातील ४० पेक्षा अधिक किल्ले सिंधुदुर्गात आहेत. या किल्ल्यांची डागडुजी न केल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मालवणच्या सागरातील सिंधुदुर्ग, तसेच विजयदुर्ग येथील किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या विचारात घेऊन आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाने निधी द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. (प्रतिनिधी)गडकिल्ल्यांची तटबंदी ढासळतेय....सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची गेल्या तीन वर्षांतील सरासरी संख्या दोन लाख ३९ हजार एवढी आहे. मात्र, या किल्ल्यावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. हा अभाव दूर करण्याची गरज असून, किल्ल्याची तटबंदीही ढासळत चालली आहे. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिर असून या मंदिराची दुरुस्ती आवश्यक असताना या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी दिला होता. मात्र, पुरातत्त्व विभागाने त्याला आक्षेप घेतल्याने तो निधी तसाच पडून आहे. शिवराजेश्वर मंदिराची दुरुस्ती, तसेच विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यासह सिंधुदुर्गातील गडकिल्ल्यांच्या तटबंदी दुरुस्तीसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली.
सिंधुदुर्ग, विजयदुर्गसाठी निधी द्या
By admin | Updated: April 10, 2015 00:24 IST