देवगड : देवगड समुद्रकिनाऱ्याजवळ गिर्ये येथे एलईडी लाईटच्या सहाय्याने मासेमारी करणारी नौका जप्त करण्यात आली. यात अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे लाईट, जनरेटर आणि इतर सामग्री जप्त केली. मत्स्यव्यवसाय विभागाने काल, बुधवारी रात्री १:२७ वाजता ही कारवाई केली.गिर्ये, देवगड समुद्रकिनाऱ्याजवळ मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक नियमित गस्त घालत असताना सुनंदा सदानंद तारी यांच्या मालकीची अश्विनी (नोंदणी क्रमांक - IND-MH-५-MM-६४६) नावाची नौका अनधिकृत एल.ई.डी. लाईटच्या सहाय्याने मासेमारी करताना आढळून आली. ही नौका गिर्ये समुद्रकिनाऱ्याच्या अंदाजे ०९ सागरी मैल आत होती. नौकेवर नौका तांडेलसह तीन खलाशी होते. मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत ही नौका जप्त केली.खलाश्यांच्या माहितीनुसार, ही नौका हनिफ बशिर मेमन यांनी भाडेकरारावर चालविण्यास घेतली होती. नौका जप्त करून आनंदवाडी, देवगड बंदरात ठेवण्यात आली. नौकेवरील मासळी साठा आढळून आलेला नाही. नौकेवरील एल.ई.डी. लाईट व संबंधित उपकरणे जप्त करून देवगड परवाना अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे लाईट, जनरेटर आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. नौकेस अंदाजे ५ लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे.सदर कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी पार्थ तावडे, पोलिस कर्मचारी पाटोळे, तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक, मालवण व देवगड यांच्या सहकार्याने करण्यात आली.
Sindhudurg: गिर्ये समुद्रकिनारी एलईडी'ने मासेमारी करणारी नौका जप्त, मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 3, 2025 18:22 IST