दापोली : हर्णै बंदरात मच्छीमार व व्यापारी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली होती. परंतु मच्छीमारांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात यश आल्याने हर्णै बंदरावर आलेले संकट तुर्तास टळल्याने हर्णै बंदरातील मच्छी लिलाव सुरु होऊन बंदर पुन्हा गजबजले आहे. हंगामाच्या सुरुवातीला मासळीला फारसा दर मिळत नाहीत, सुरुवातीच्या काळात बोटमालक व खलाशी यांच्यात समान हिस्सा असतो. त्यामुळे बोटीची डागडुजी, देखभाल, हप्ता, डिझेल इतर खर्च बोटमालकाला भागवावा लागतो. परंतु, हंगामाच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांकडून दर पाडून मासळीची खरेदी केली जाऊ लागल्याने आम्हाला दर वाढवून द्यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात होती. परंतु, दर वाढवून देण्यास व्यापाऱ्याने टाळाटाळ केल्यानेच आम्ही संघर्षासाठी रस्त्यावर उतरल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मच्छीमार व व्यापारी यांच्या संघर्षात पाच दिवस बंदरातील लिलाव ठप्प होता. मासे खरेदी करण्यासाठी व्यापारीच पुढे येत नसतील तर मासेमारी करुन आणलेल्या माशांचे काय करायचे, हा प्रश्न मच्छीमारांना पडला होता. त्यामुळे हर्णै बंदरात एकदम मंदीचे सावट पसरले होते. परंतु शुक्रवारी मच्छीमार व स्थानिक व्यापारी यांच्यात चर्चा होऊन कोळंबीला १६२ रुपये किलो तसेच टायनी कोळंबी ४५ रुपये प्रतीकिलो दर देण्याचे व्यापाऱ्यांनी बैठकीत मान्य केले. तसेच सुरमई, पापलेट दरसुद्धा योग्य देण्याचा निर्णय झाला. मच्छीमार समाजातील नेते यांनी या बैठकीत तोडगा काढण्यास मदत केली. मच्छीमार बांधवांच्यावतीने संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, सुवर्णदुर्ग मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष रऊफ हजवाने यांनी भाग घेतला. दोन्ही बाजू समजावून घेण्यात आल्या. गेल्या हंगामात साधी कोळंबीचा दर २४५ रुपये प्रतीकिलो होता. तसेच टायणीचा दर ११० रुपये प्रतीकिलो होता. त्यामुळे तोच दर यावर्षी मिळावा असा समज मच्छीमारांचा होता. परंतु, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती घसरल्याने जागतिक बाजारपेठेत मच्छीचे दर घसरले आहेत. त्यामुळे यावर्षी मासळीचे दर कमी आहेत, असा खुलासा व्यापाऱ्यांनी केला व यावर तोडगा काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)
मासळीच्या लिलावाने हर्णै गजबजले
By admin | Updated: August 23, 2015 00:39 IST