लांजा : सातबारा आणि फेरफार आॅनलाईन झाल्याने शेतकऱ्यांना आता तलाठी कार्यालयात मारावे लागणारे खेटे बंद होणार आहेत. लांजा महसूल यंत्रणेने वर्षभरात १ लाख १४ हजार ६६६ सातबारा फेरफार आॅनलाईन करुन लांजा तालुका राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला असल्याची माहिती तहसीलदार दशरथ चौधरी यांनी दिली आहे.सन २०१३ मध्ये महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग अधिकारी अभिलेखातील नोंदी व त्यांच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण ई फेरफार कार्यक्रम राज्यात सुरु केला. लांजा तालुक्यातील महसूल प्रशासनाने १ लाख १४ हजार ६६६ सातबारे, फेरफार आॅनलाईन करण्याची मोहीम हाती घेतली. तत्कालीन तहसीलदार जयसिंग ठाकूर आणि सध्याचे तहसीलदार दशरथ चौधरी यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन सर्व सातबारा उतारे व फेरफार आॅनलाईन करण्याचे मोहीम फत्ते केली. त्याचबरोबर महसूल कर्मचारी यांनी मेहनत करुन ही कामगिरी यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले. अधिकारीवर्ग व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे मधूर असे फळ लांजा महसूल यंत्रणेला प्राप्त झाले आहे. संपूर्ण राज्यात लांजा तालुका आॅनलाईन सातबारा उतारे व फेरफार करण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने आता आॅनलाईन फेरफार सातबारा मिळण्यास सज्ज झाले आहे.आता हस्तलिखित कागदपत्र मोडीत काढून प्रत्येक शेतकऱ्याला व नागरिकाला आपले सातबारा उतारे कधीही कुठेही आॅनलाईन पाहायला मिळणार आहेत. २० आॅक्टोबर २०१४ पासून हस्तलिखित सातबारा आणि फेरफार नोंद मिळवण्याचे बंद करण्यात येत असल्याने शासनाने एका निर्णयानुसार २ आॅक्टोबरला लांजा महसूल प्रशासनाला कळवण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागत होते. ते बंद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. एक तलाठी दोन तीन गावाचा कारभार सांभाळत असल्याने शेतकऱ्यांना तलाठी वेळेवर मिळत नव्हते. आता आपले सातबारा उतारे व फेरफार एका बटणाच्या क्लिकवर घरबसल्या मिळणार आहेत.राज्यात पहिला येण्याचा बहुमान लांजा तालुक्याने पटकावला आहे. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील एका तालुक्याने असाच क्रमांक पटकावला. (प्रतिनिधी)लांजा तालुक्यात १२४ महसूली गावे असून, १ लाख १४ हजार ६६६ सातबारा उतारे व फेरफार संगणकाला जोडले आहेत. त्यामुळे जनतेला तलाठ्यांकडे सातबारा व फेरफार मागण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
आॅनलाईन फेरफारमध्ये लांजा राज्यात प्रथम
By admin | Updated: October 6, 2014 22:42 IST