सिंधुदुर्गनगरी : ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांचे विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता याची चौकशी करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गवस यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली.ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेकवेळा प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित ठेकेदार महाआॅनलाईन कंपनीकडून त्यांना योग्य मानधन दिले जात नाही. प्रामाणिक काम करूनही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंटाळलेल्या संगणक परिचालकांनी १२ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. तर याच दरम्यान जिल्हा परिषदेसमोर दोन दिवस धरणे आंदोलन व एक दिवस स्वच्छता मोहीम राबवून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले होते. आमदार नीतेश राणे यांनी संगणक परिचालक यांची भेट घेतली. त्यावेळी महाआॅनलाईनचे विभागीय समन्वयक सुयोग दीक्षित उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी दोन दिवसांत आपण संगणक परिचालकांना निश्चित करण्यात आलेल्या ८ हजार मानधनापैकी ४ हजार एवढी मानधनाव्यतिरिक्त खर्च करण्यात येणाऱ्या रकमेचा अहवाल देण्याचे मान्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांनी तसा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे या निधीचा घोळ केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.संगणक परिचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री यांची संघटना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता या योजनेची परिपूर्ण माहिती घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गवस, सचिव आदेश परब यांनी दिली. मात्र, जोपर्यंत सकारात्मक निर्णय झाल्याचे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन सुरुच राहील असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)ग्रामसेवक संघाचा पाठिंबाजिल्ह्यात आपल्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात संगणक परिचालकांनी पुकारलेल्या बेमुदत ‘कामबंद’ आंदोलनास जिल्हा ग्रामसेवक संघटनेचा पाठिंबा असल्याचे लेखी पत्र संगणक परिचालक संघटना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी संगणक परिचालकांकडे वाढलेला कामाचा भार तसेच तालुक्याच्या ठिकाणी मासिक सभेला जाण्यायेण्यासाठी लागणारा खर्च पाहता त्यांना परवडणारे नाही. तसेच त्यांच्याकडे १ ते ११ सॉफ्टवेअर, १ ते २७ नमुने तसेच सर्व प्रकारचे दाखले देण्याचे कामकाज असल्याने त्यांना पूर्णवेळ काम करावे लागते. त्यांना कुठलाही प्रवासभत्ता मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मागण्या व सुरु असलेले आंदोलन योग्य असून आमचा पाठिंबा असल्याचे नमूद केले आहे.
संगणक परिचालकांचे उपोषण
By admin | Updated: December 1, 2014 00:19 IST