दोडामार्ग : गोवा सरकारने राज्यात प्रवेश करणाऱ्या परराज्यांतील वाहनांबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून वाहूतक करणाऱ्या गोवा राज्य परवान्याच्या गाड्यांनाही प्रवेश शुल्क आकारल्याने सोमवारी गोवा-दोडामार्ग येथील टोलनाक्यावर वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. कोणत्याही परिस्थितीत टोल भरणार नाही, अशी भूमिका गोवा परवान्याच्या गाड्या असलेल्या वाहनचालकांनी लावून धरत वाहतूक बंद ठेवली. खासगी बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. प्रवेशकर रद्द न झाल्यास या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा गोव्यातील वाहनचालकांनी दिला आहे. त्यामुळे गोवा सरकारला इतरांसोबत स्वत:च्या राज्यातील वाहनचालकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. हा वाद पेटण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वी गोवा राज्यात भाजपप्रणीत सरकारने परराज्यांतील वाहनांना प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्याला नजीकच्या कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर परवान्याच्या गाड्यांना सवलत दिली होती. मात्र, आता परराज्यातील वाहनांनाही प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर गोवा परवान्याच्या कमर्शियल वाहनांनासुद्धा मासिक पास आकारून नव्याने प्रवेश शुल्काचे धोरण आखण्यात आले. गोवा हद्दीत येणाऱ्या दोडामार्ग येथील टोलनाक्यांवर सोमवारी सकाळ-पासूनच निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे वाहनचालक आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सिंधुदुुर्गातून गोव्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस, ट्रक, टेम्पो, आदी वाहनचालकांनी टोल भरण्यास नकार दर्शवीत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश शुल्क भरणार नाही, अशी भूमिका घेत वाहतूक बंद ठेवली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. दोडामार्गातून युवक-युवती गोव्यात कामधंद्यासाठी नेहमी जातात. या सर्वांची प्रवासी वाहतूक बंद ठेवल्याने मोठी गैरसोय झाली. अन्य राज्यांतील वाहनचालकांनीही सुरात सूर मिळवून नजीकच्या जिल्ह्यांतील गाड्यांनाही सवलत मिळालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)
प्रवेशकरावरून दोडामार्गात खडाजंगी
By admin | Updated: June 1, 2015 23:52 IST