सावंतवाडी : सर्पदंशामुळे रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल न केल्याने अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर सापाचा शोध घेण्यात वेळ न दवडता रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याविषयीचे प्रबोधन ग्रामीण भागात होणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा गंभीर रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार मिळवून द्यावेत, असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. सर्पदंशाच्या रुग्णावर रुग्णालयातील डॉक्टरनी तत्काळ योग्य उपाय करणे गरजेचे आहे. गंभीर रुग्णांना व्हेन्टेलेटरची आवश्यकता असल्यास राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांना उपचारासाठी पाठवावे. अथवा शासनाच्या १८००२३३२२०० या राजीव गांधी आरोग्य मित्राशी संपर्क साधल्यास कोल्हापूरच्या रुग्णालयांची माहिती मिळू शकते. विषारी सर्पदंशानंतर दोन तासांपेक्षा उशिराने रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास किडनीमध्ये विष उतरून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. याची कल्पना डॉक्टरनी रुग्णांच्या नातेवाईकांना देणे गरजेचे आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना दाखला व रेशनकार्ड दाखविल्यास रुग्णवाहिका मोफत मिळते. काही जणांना बिनविषारी सापांचा दंश होतो. परंतु अशा रुग्णांना २४ तासांच्या उपचारांनंतरच घरी पाठविणे हितावह ठरते, असे मसूरकर यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)
सर्पदंश उपचाराबाबत प्रबोधन आवश्यक
By admin | Updated: January 8, 2015 00:04 IST