कसई दोडामार्ग : सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी विशेष शिक्षकांना शासन सेवेत कायम करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन अपंग समावेशीत शिक्षण विशेष शिक्षक संघ, जिल्हा शाखा सिंधुदुर्गतर्फे लोक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांना देण्यात आले. शासन स्तरावर पाठपुरावा करून आपणाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन बेलसरे यांनी दिले. नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी संचलित लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर वझरे येथे झाले. या शिबिराचे उद्घाटन बेलसरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांची भेट घेऊन या संघटनांनी निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल देगावकर, सचिव दिगंबर काळे, सल्लागार मिलिंद सरवदे, उमेश विरकर, सदस्य शिवानंद घेडगे, जालिंदर कदम, अकबर शेख, सर्वेश राऊळ, प्रफुल्लकुमार कातोरे, संतोष चागलवाड, योगेश पांढरे, कमलेश कामनेकर, योगेश लगडे उपिस्थत होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष शिक्षकांची २००१ पासून प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. तुटपुंज्या मानधनावर सर्वांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. गेली १२ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना विविध सोयीसुविधा देऊन अध्यापनाचे, व्यावसायिक कौशल्ये शिकविण्याचे काम करीत आहोत. विशेष शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. परंतु शासनाकडून या विशेष शिक्षकांना १२-१३ वर्षांपासून सेवेत कायम करून घेतलेले नाही. वेळोवेळी शासन दरबारी कैफियत मांडली. परंतु आजही न्याय मिळाला नाही. सर्वांना कायम सेवेत सामावून घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनांनी केली. (वार्ताहर)
कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करा
By admin | Updated: December 29, 2014 00:07 IST