चिपळूण : जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मतिमंद मुलांना पेन्शन मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सीताराम शिंदे यांनी पत्रकारांना दिली.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ही राज्य पातळीवरील जिल्हा परिषद सेवा निवृत्तांची एकमेव संघटना आहे. राज्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतन मिळण्यास अनेक अडचणी निर्माण होऊन वयोवृद्ध सेवानिवृत्तांना त्यांच्या वृध्दापकाळात निवृत्तिवेतन मिळण्यास दिरंगाई होऊ लागल्याने या संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटना स्थापन होऊन ७ वर्षे झाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सेवानिवृत्तांची मुले मंद असतील तर त्यांचे हाल होतात. त्यासाठी त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी संघटनेचा प्रयत्न सुरू आहे. शासन पातळीवर यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. या कालावधीत निवृत्तिवेतन मिळणे, देय रकमा मिळणे, सेवानिवृत्तांना जातपडताळणीतून वगळणे, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी सुधारणे, ८० वर्षांवरील सेवानिवृत्तांना वाढ देणे, ज्या सेवानिवृत्तांची मुले मंद आहेत, त्यांना पेन्शन मिळवून देणे, आदी प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविले जातात. जिल्हाध्यक्ष अब्बास मुल्ला, उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर, सचिव अशोक बसणकर व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष संघटनेचे काम करीत आहेत. सांगली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून मारुती सावंत, सदाशिव वाले, दिनकर पाटील, श्याम पाटील, तर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वास साबळे, सचिव श्रीधर कागलकर, कोषाध्यक्ष मंगल ठाकूर, अशोक बोरकर, अनंत खोपडे, शिशुपाल कुलकर्णी या सर्वांच्या प्रयत्नाने त्या त्या जिल्ह्यात संघटना कार्यरत आहे. या संघटनेचे जिल्हा व तालुका अशी रचना असून, एकाच नोंदणी क्रमांकाखाली काम सुरू आहे. सोलापूर, सातारा, अहमदनगर जिल्ह्यात शाखा स्थापण्यासाठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष विनायक घटे, राज्य सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, कोषाध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष कृ. आ. पाटील, माजी अध्यक्ष शंकर शेडगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
सेवानिवृत्तांच्या मतिमंद मुलांना पेन्शन देण्यावर भर देणार
By admin | Updated: August 8, 2014 00:44 IST