वेंगुर्ले : ‘खेळातून मैत्री... पर्यटनातून समृद्धी’ असा संदेश देत एका हातात पॉवर लिफ्टिंंगचे शक्तीप्रदर्शन करीत आणि दुसऱ्या हातात आरोग्य संपन्नतेचे प्रतीक असणाऱ्या सिंधू भूमीतील आंबा, काजू, जांंभूळ या नैसर्गिक देणग्यांचे महत्त्व सांगणाऱ्या अरबी समुद्राच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘डॉल्फिन’ या शुभंकराचे येथे दिमाखदार अनावरण करण्यात आले. ‘सुदृढ बलवान सिंधुदुर्ग पर्यटकांचे नंदनवन सिंधुदुर्ग’ हे घोषवाक्य घेऊन पुष्कराज कोले मित्रमंडळातर्फे १० ते १२ डिसेंबर या कालावधीत येथील साई मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनियर, सब ज्युनियर, मास्टर, सीनियर पॉवरलिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धा २०१४ चे आयोजन केले आहे. स्पर्धेची पूर्वतयारी उत्साहात सुरू असून, सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या पॉवर लिफ्टिंगच्या राज्य व राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत पुष्कराज कोले मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मनमोहन दाभोलकर यांच्या हस्ते या ‘शुभंकर डॉल्फिन’चे अनावरण करण्यात आले. संस्थेचे खजिनदार राजेश घाटवळ, संचालक सागर परब, सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे संचालक प्रशांत नेरूरकर आदी यावेळी उपस्थित होते. राज्यस्तरीय स्पर्धा आणि सिंधुदुर्गातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०१४’ मध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले. सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या स्वरा तळेकर यांनी सूत्रसंचालन केले. पॉवर लिफ्टिंगचे प्रशिक्षक अमोल तांडेल, पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे सचिव किशोर सोन्सुरकर, सिंधुदुर्ग विद्या निकेतनचे उपाध्यक्ष इर्शाद शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. (प्रतिनिधी)
डॉल्फीन शुभंकराचे दिमाखदार अनावरण
By admin | Updated: December 2, 2014 21:26 IST