रत्नागिरी/चिपळूण : गेले काही दिवस असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आधीच बागायतदार चिंतेत असताना आज, गुरुवारी पडलेल्या पावसाने त्यात भर घातली आहे. आज रत्नागिरी, संगमेश्वरसह चिपळूण तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा आणि काजूला दुसऱ्या टप्प्यात आलेला बराच मोहोर गळून पडला आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दाट मळभाचे वातावरण असून, त्यामुळे आंबा, काजूचा चांगला आलेला मोहोर खराब होत आहे. गेले १५ दिवस चांगली थंडी पडत असल्याने दुसऱ्या टप्प्याचा मोहोर बहरला आहे. मात्र, सतत मळभ असल्याने तो खराब होऊन त्यावर कीड, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. आॅक्टोबरअखेरीस आलेला पहिल्या टप्प्याचा मोहोर नोव्हेंबर, डिसेंबरच्या अवकाळी पावसामुळे खराब होऊन फुकट गेला होता. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जोरदार थंडी पडण्यास सुरुवात होऊन दुसऱ्या टप्प्यातील मोहोर फुटण्यास पोषक वातावरण निर्माण झाले. त्यानुसार चांगला मोहोर आलाही. मात्र, आता त्यालाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे तो खराब होण्याची शक्यता असल्याचे करंजारी येथील आंबा बागायतदार राजेश हेगिष्टे यांनी सांगितले.रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरातील चरवेली, कापडगाव, नागलेवाडी, साठरेबांबर, खानू, कशेळी, नाणीज, मठ, चोरवणे, करंजारी, तसेच संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे, बुरंबी, मुचरी या परिसरात आज पाऊस पडला.चिपळूण तालुक्याच्या काही भागातही आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे आंबा व काजू पिकाला फटका बसण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे. गेले दोन ते तीन दिवस कडाक्याची थंडी पडत आहे. त्यातच हवामान ढगाळ होते. आज दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झाले नव्हते. रामपूर परिसरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रामपूर, गुढे, उमरोली, पाथर्डी, मिरवणे, मार्गताम्हाणे या भागात पावसाने हजेरी लावली. हवामान ढगाळ असले तरी चिपळूण शहरात मात्र पावसाचा एकही थेंब पडला नाही. (प्रतिनिधी)
अवकाळीचा आंबा, काजूला फटका
By admin | Updated: January 2, 2015 00:16 IST