सावंतवाडी : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्यांना स्थानिकांच्या रोषास सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात वैद्यकीय अधिकार्यांना चांगली वागणूक मिळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. सिंधुदुर्गात वैद्यकीय अधिकारी कायमस्वरुपी नाहीत. मात्र, शिपाई कायमस्वरुपी असतात असे सांगत जठार यांनी डॉक्टर आल्यावर त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि ते चार महिन्यातच जिल्ह्याबाहेर जातात. सध्या जिल्ह्यात चार चांगल्या डॉक्टरांवरच्या जीवावरच सहा ग्रामीण रुग्णालये व दोन जिल्हा रुग्णालये सुरू आहेत. तसेच श्रीलंकेकडून देवगडमध्ये आलेल्या चांगल्या डॉक्टरांची मालवणच्या रुग्णालयांमध्ये बदली करुन पळवापळवीची कामे करण्यात येत आहेत, असे आमदार जठार यांनी सांगितले. एक परिपूर्ण वैद्यकीय अधिकारी तयार व्हायला ३५ वर्षे लागतात. मात्र, त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. तसेच त्यांना मारहाणही केली जाते. सध्या वैद्यकीय अधिकार्यांना ५० हजार ते १ लाखापर्यंत पगार दिला जातो. असे डॉक्टरही येथील स्थानिकांच्या रोषामुळे चार ते पाच महिनेच राहतात. भाजपाचे सरकार आल्यास जिल्ह्यात चांगले डॉक्टर उपलब्ध करून त्यांना दुप्पट मानधन दिले जाईल, असे सांगितले. यामुळे शहरात वाढत चाललेल्या खासगी रुग्णालये थांबून सरकारी आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची भरती केली जाईल. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे शासनाने का भरली नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गडचिरोली व सिंधुदुर्गात डॉक्टर यायला बघत नाहीत. यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानेच डॉक्टरांची काळजी घेतली पाहिजे, असे आमदार जठार यांनी सांगितले. (वार्ताहर)
स्थानिकांच्या रोषामुळेच आरोग्य यंत्रणा कोलमडली प्रमोद जठार : अधिकार्यांना चांगली वागणूक मिळणे गरजेचे
By admin | Updated: May 11, 2014 00:01 IST