कुडाळ : पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीत दीड महिना उलटूनही पॉलिसीचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने पॉलिसीधारक व शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील कार्यालयात धडक देत शाखा व्यवस्थापकांना धारेवर धरले. पॉलिसीधारकांचे पैसे देण्याचे मान्य केल्यानंतर हा घेराओ मागे घेण्यात आला. दुपारी घेराओनंतर काहीवेळेतच हे पैसे त्या पॉलिसीधारकांच्या खात्यावर जमा करण्यात आले. काही तांत्रिक कारणामुळे चेक जमा करण्यास विलंब झाल्याचे या संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले. कुडाळ- पानबाजार येथे पॅनकार्ड क्लबचे कार्यालय असून येथे पॉलिसी काढून पॉलिसीधारकाला गुंतवणुकीप्रमाणे पैसे देण्यात येतात. या पॅनकार्ड क्लबमध्ये मालवण येथील भरत वराडकर व माणगाव येथील सुधाकर रामदास यांनी पॉलिसी उतरविली होती. या दोघांच्याही पॉलिसी पूर्ण होऊन दीड महिना उलटला आहे. भरत वराडकर यांच्या पॉलिसीचे १ लाख २ हजार तर सुधाकर रामदास यांना १५ हजार रुपये पॅनकार्ड क्लबकडून देणे आहे. पॉलिसीचे पैसे मिळविण्यासाठी या दोघांनीही पॅनकार्ड कार्यालयात चार ते पाचवेळा फेऱ्या मारल्या. परंतु पैसे मिळाले नाहीत.अखेर रामदास आणि वराडकर यांनी याबाबतची तक्रार शिवसेनेचे युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्याकडे केल्यानंतर शिरसाट हे त्वरित आपल्या कार्यकर्त्यांसह पॅनकार्डच्या कार्यालयात दाखल झाले. पॉलिसीची १९ जूनची तारीख संपूनही अजूनही पैसे न दिल्याबाबत ब्रँच मॅनेजर विजय नाटलेकर यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारून धारेवर धरले. तत्काळ पैसे बँक खात्यावर जमा करा, अन्यथा इथून हलणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच पॉलिसीधारकांचे पैसे मुदतीनंतरही दीड महिना वापरल्याने कंपनीने त्यांना व्याजासहीत रक्कम परत करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्यासह कुडाळ सुधार समितीचे प्रसाद शिरसाट, उमेश गाळवणकर, सुशील चिंदरकर, रामदास शिरसाट, अन्य नागरिक व पॉलिसीधारक उपस्थित होते. (प्रतिनिधी)तांत्रिक कारणामुळे अडचणकाही तांत्रिक कारणामुळे ग्राहकांना वेळेत चेक देता आले नाहीत. गेली १७ वर्षे आम्ही पॅनकार्ड क्लब लिमिटेड या संस्थेच्या मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो ग्राहकांना चांगली सेवा देत आहोत. यावेळी पैसे देण्यात वेळ झाल्याने असा प्रकार घडला. कंपनीने दिलेले चेक एकदाही बाऊन्स झालेले नाहीत. आता काहीजणांच्या झालेल्या मॅच्युरिटीबाबत उर्वरित ६० ते ६५ जणांचे चेक आम्ही आठ ते पंधरा दिवसांत देणार आहोत. आजदेखील ही घटना घडल्यानंतर दुपारी काहीवेळातच संबंधित खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा झाली.- प्रमोद नाईक, वरिष्ठ अधिकारी
पैसे वेळेत न मिळाल्यामुळे शिवसैनिकांची कार्यालयावर धडक
By admin | Updated: July 22, 2014 22:13 IST