कुडाळ : तालुक्यात दोन दिवस अहोरात्र सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. कुडाळ तालुक्यातील बऱ्याच पुलांवर पाणी आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तसेच आंबेडकरनगर येथील दहा घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतर करावे लागले. तर दुकानवाड येथील पुलाचा काही भाग वाहून गेल्याने सात गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अन्य ठिकाणीही पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.श्रावण महिन्याची सुरुवात पावसाच्या मुसळधार सरींनी झाल्याने दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने उग्र रुप धारण केल्याची स्थिती आहे. यामुळे कुडाळ तालुक्यतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. पावसामुळे कर्ली, भंगसाळ, बेलनदी आदी नद्यांची पात्रे दुथडी भरुन वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून कित्येक ठिकाणी शेती बागायतींमध्ये पाण्याचा प्रवाह घुसला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पीठढवळ नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गाड्यांच्या रांगाच लागलेल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक गुरुवारी सकाळीही विस्कळीतच होती. गुरुवारी सकाळीही महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे गाड्यांना थांबवून ठेवण्यात आले होते. काहीकाळ महामार्ग बंदावस्थेत होता. माणगाव खोऱ्यातील आंब्रड, कुपवडे, तसेच अन्य गावातील रस्तेही पाण्याखाली गेले. त्यामुुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती तर काही ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने सुरु होती. माणगाव खोऱ्यातील दुकानवाड येथील पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. यामुळे या पुलावरुन वाहतूक करणे जिकिरीचे बनले असून शिवापूरपर्यंतच्या सात गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे.कुडाळ शहरातील वाढत्या बांधकामांमुळे पाण्याचा प्रवाह शहरापर्यंत येत असल्याचे निदर्शनास येत आहे. नदीपात्रानजीक बांधकामांसाठी मातीचा भराव टाकण्यात आल्याने पुराचे पाणी शहराच्या काही भागात येत आहे. पीठढवळ, बेलनदी या महामार्गावरील नद्यांना पाणी आल्याने महामार्गावरही पाणी आले होते. तसेच आंब्रड, कुपवडे पुलावरही पाणी आल्याने अनेक एसटीच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. (प्रतिनिधी)
दहा घरांमध्ये पुराचे पाणी
By admin | Updated: July 31, 2014 23:32 IST