सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्यातच शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याबाबतचे धोरण आखण्यात येणार आहे. रिक्त पदे भरण्यासाठी सिंधुदुर्गाला प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा कायापालट करणार असल्याच प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे केले.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यांतर्गत आज, शनिवारी दुपारी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आरोग्य उपसंचालक सतीश पवार, शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने, अभय शिरसाट, राजन नाईक, जान्हवी सावंत, आदी उपस्थित होते. मंत्री सावंत म्हणाले की, रुग्णालयातील रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्याचा प्रयत्न आहे. रुग्णालयासंबंधी पदविका अभ्यासक्रम सिंधुदुर्गात सुरू करणार असून त्याची पहिली बॅच आॅगस्टमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील तज्ज्ञ डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयाला १०८ नंबरच्या दोन रुग्णवाहिका देणारसिंधुदुर्गात १०८ या टोल फ्री नंबरच्या आणखीन दोन रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. या दोन रुग्णवाहिका अद्ययावत असतील.इगल कंपनीमार्फत एन.आर. एच.एम. अंतर्गत नियुक्त ४७ डाटा एंट्री आॅपरेटर्सना गेल्या आठ महिन्यांपासून मानधन देण्यात आले नसल्याची बाब मंत्री सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले की, इगल कंपनीला शासनाकडून या आॅपरेटर्सच्या मानधनासाठीचा निधी वर्ग करूनही ‘त्या’ कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांना मानधन दिले नाही. कंपनीला या करारातून हटविले असून संबंधित कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जाणार आहे. तसेच एन.आर.एच.एम. अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत भविष्यात निर्णय घेण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
डॉक्टरांची रिक्त पदे भरणार
By admin | Updated: January 4, 2015 01:01 IST