सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजनच्या १०० कोटी मंजूर आराखड्यापैकी ६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी संबंधित विभागांकडे वितरीत करण्यात आला आहे. तर विधानसभा आचारसंहिता लक्षात घेऊन नव्याने ९ कोटीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी एच. बी. थोरात यांनी दिली.जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी यांच्या बदलीनंतर जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून एच. बी. थोरात यांनी नव्यानेच कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी कार्यभार स्वीकारताच जिल्हा नियोजन विकास आराखड्यातील मंजूर कामाचा व सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला तर काही विकासकामांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या १०० कोटी निधीपैकी आतापर्यंत ६० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. हा निधी संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात आला आहे. तर नव्याने ९ कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर आराखड्याच्या दीडपट कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याने प्राप्त निधी १०० टक्के खर्च होण्यास कोणतीही अडचण राहणार नाही अशी माहिती नव्याने नियुक्त झालेले जिल्हा नियोजन अधिकारी एच. बी. थोरात यांनी दिली. जिल्ह्यात सुरु असलेल्या विकासकामांची येत्या दोन दिवसांत पहाणी करणार असून विकासकामांना गती देण्याबरोबरच होणारी कामे दर्जेदार व्हावीत यादृष्टीने आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
जिल्हा नियोजनचा ६0 कोटी निधी प्राप्त
By admin | Updated: September 9, 2014 23:48 IST