शिरोडा : जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांचा गाव विकासात्मक ‘गावभेट’ कार्यक्रम आरवली येथील पणशीकर मंगल कार्यालयात नुकताच झाला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेत त्याचे निरसन लवकरात लवकर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.प्रास्ताविकात दिलीप पणशीकर यांनी आरवली गावच्या विकासासाठी व प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या समस्यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने हा गावभेट कार्यक्रम आयोजित केल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने डॉ. प्रसाद साळगावकर यांनी आरोग्य विषयक समस्या मांडल्या. तसेच पर्यटनदृष्ट्या नमस शेंड्याच्या तलावाचे सुशोभिकरण करण्याविषयी सूचना केली. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी चांगली राहण्यासाठी याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. बाळा जाधव यांनी हरिजनांच्या दफनभूमीबाबत लक्ष घालून ती ताब्यात घेण्याबाबत आग्रही प्रतिपादन केले. आरवली ग्रामपंचायतीची इमारत २००० साली बांधली व सन २०१० साली निर्लेखित करण्यात आल्याबाबत स्पष्टीकरण मागितले. दादा राय यांनी महसुलबाबत कुळ कायद्यांतर्गत काही प्रश्न विचारले. श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे सचिव जयवंत राय यांनी देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत समाविष्ट करण्याबाबत मागणी केली. आरवली नळपाणी योजनेंतर्गत १ कोटी रुपये खर्चूनही गावातील लोकांना पाणी पुरवठा होत नसल्याबाबत लक्ष वेधले. बाळू वस्त यांनी कडोबा डोंगर खचून माळीणची पुनरावृत्ती होऊ नये, या दृष्टीने खबरदारी घेण्याची सूचना केली. महेश कनयाळकर, सुदन टाककर, सुधाकर राणे यांनी निवेदने सादर केली. यावेळी सुमारे साडेसात लक्ष रुपये खर्च करून पर्यटन पॅकेजांतर्गत बांधलेल्या पे अँड युज टॉयलेटच्या अज्ञात व्यक्तींनी केलेल्या तोडफोडीची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार जगदीश कातकर, सरपंच श्रध्दा सावळ, सागरतीर्थ उपसरपंच किस्तू सोज, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुनील दळवी, पंचायत समिती उपसभापती सुनील मोरजकर, सदस्य उमा मठकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या समस्या
By admin | Updated: August 24, 2014 00:51 IST