सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील आयटीपार्कमधील पाण्याचा टँक पाण्याने भरण्यात आला आहे. मात्र, त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने हा पाण्याचा टँक डास उत्पत्ती केंद्र बनला आहे.जिल्हा हिवताप विभागामार्फत डास निर्मूलन मोहीम जिल्ह्यात राबविली जात असली तरी जिल्हा मुख्यालय परिसरात असणाऱ्या आयटी पार्कमध्ये असलेल्या पाण्याच्या टँकमध्ये गेले दोन महिने पाणी साठवून ठेवल्यामुळे होणाऱ्या डास निर्मितीकडे मात्र हा विभाग डोळेझाक करत आहे. जिल्ह्यात डेंग्यूची साथ फैलावत आहे. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हिवतापाचे रुग्णही वाढत आहेत. विविध तापाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार आजच्या स्थितीला ४१ तापाचे रुग्ण दाखल झाले आहेत.जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नव्यानेच भव्य असे आयटी पार्क उभारण्यात आले आहे. त्यामध्ये पाण्याचा टँक बांधून त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. या टँकमधील पाणी बदलण्यात येत नाही. त्यामुळे या पाण्यात गाळही साठला आहे. अनेक महिने पाणी साठून राहिल्याने या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डास निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याठिकाणी सायंकाळी शासकीय वसाहतीतील कर्मचारी व त्यांची मुले रोज फिरण्यासाठी जातात. अशांना तापाची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सिंधुदुर्गनगरी आयटी पार्कमधील पाण्याच्या टँककडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे टँक डास निर्मिती केंद्र बनले आहे. मात्र, या अतिगंभीर समस्येकडे जिल्हा हिवताप विभागाचे लक्ष गेलेले नाही. जिल्ह्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. हे बंधारेही डास उत्पत्तीचे कारण बनणार आहेत. याबाबत हिवताप विभागाचे नियोजन काय? पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बांधण्यात येणारे जिल्ह्यातील बंधारे हिवताप विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे डास निर्मितीला कारण बनणार आहेत. (प्रतिनिधी)
पाण्याचा टँक बनला डास उत्पत्ती केंद्र
By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST