शिवाजी गोरे, दापोली : मधुमेह म्हटले की, डॉक्टर सर्वप्रथम भात बंद करायला सांगतात, पण आता मधुमेहींनाही खाता येईल, अशा भाताचे नवे वाण विकसित करून येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने त्यांना खुशखबर दिली आहे. तांदळाचे लाल रंगाचे बारीक व बुटके दाणे असलेल्या या भाताच्या नव्या जातीत शर्करेचे प्रमाण कमी आणि लोह अधिक असल्याने हा भात सर्वसामान्यांबरोबरच मधुमेहींच्या तोंडाची चवही वाढवणारा ठरेल. शिवाय सध्या जेथे भात पिकविले जाते त्याच क्षेत्रात सुमारे दीडपट अधिक उत्पादन देणारे असल्याने हे नवे वाण सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही वरदान ठरणार आहे. कोकणातील शेतकऱ्याला भातशेती परवडत नसल्याने कोकण कृषी विद्यापीठाच्या अथक प्रयत्नाने अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आता कृषी विद्यापीठाने दीडपट उत्पादन देणारे लाल भात हे नवे वाण विकसित केले आहे. विद्यापीठाने यापूर्वी विकसित केलेल्या रत्नागिरी, कर्जत आदी भाताच्या जाती शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पारंपरिक बियाण्यांमधून हेक्टरी २० क्विंटलइतके भाताचे उत्पादन मिळत होते. गेल्या काही वर्षांत संशोधित केलेल्या विविध जातींमुळे ते हेक्टरी ४५ क्विंटलपर्यंत वाढले. आता येथील शास्त्रज्ञांनी लाल भात बियाणे विकसित केले आहे. या बियाण्यापासून हेक्टरी सुमारे ६० क्विंटल उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे. कमी खर्चात वाढत्या उत्पादकतेमुळे शेतकरी पुन्हा भात शेतीकडे वळतील, असा विश्वास शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. लाल भाताच्या नव्या जातीत कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. तसेच लाल भातातून लोहही जास्त प्रमाणात मिळणार आहे. या भाताचा सर्वाधिक फायदा मधुमेहींना होणार आहे.
मधुमेहींनाही खाता येईल आता भात !
By admin | Updated: July 19, 2015 00:33 IST