सचिन मोहिते - देवरुख - ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकांची रत्नािगरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून देवरुख ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त आहे. सध्या या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ‘प्रभारीं’वरच अवलंबून आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पदही तीन महिन्यांपासून रिक्त असल्याने गरीब व गरजू रुग्णांची हेळसांड होताना दिसत असून, त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.देवरुख ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक एका पदासह एकूण चार पदे रिक्त आहेत. यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, कक्षसेवक १, सफाईकामगार १ अशी एकूण चार पदे रिक्त आहेत.देवरुख रुग्णालय हे तालुक्याच्या ठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालय आहे. मध्यवर्ती असलेल्या या रुग्णालयाचा फायदा असंख्य रुग्णांना होत आहे. ग्रामीण रुग्णालये ही गरिबांचा आधार ठरताना दिसतात. मात्र, या रुग्णालयात असणाऱ्या सेवा उपलब्ध झाल्या नाहीत, तर अनेक गरजूंना खासगी सेवेचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.देवरुख रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ नियत वयोमानाने सेवानिवृत्त होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, ही जागा अद्याप रिक्त असल्याने या ठिकाणी रक्त तपासणी आणि रक्त नमुने अहवाल यांची कामे ठप्पच आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या आणि रक्तचाचणी होणे आवश्यक असलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यामधून रक्त चाचणी करुन घ्या, असा सल्ला दिला जात आहे. अर्थात सल्ला देणारेही पर्याय उपलब्ध करु शकत नसल्याने त्यांना हा सल्ला द्यावा लागत आहे.दुसरीकडे देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. देवकर यांची रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बदली झाल्यानंतर हे पदही गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. त्याचा पदभार संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप हे सांभाळत आहेत. अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे देवरुख ग्रामीण रुग्णालय हे प्रभारींवरच चालत असल्याने गरिबांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.सर्वसामान्यांना खासगी रक्त तपासणी केंद्रात जावून रक्त तपासणी करुन घेण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा प्रत्यय देणारी घटना शुक्रवारी रुग्णालयात दाखल झालेल्या शांताराम जुवळे या वृद्ध गृहस्थाच्या बाबतीत घडला आहे असे प्रक़ार कायमच होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद भरण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. असे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला विचारले असता मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मागणी करण्यात येत आहे तर वरिष्ठ पातळीवरुन या मागणीकडे का दुर्लक्ष होत आहे, असा सवाल स्थानिकांतून देखील होत असून, अंमलबजावणी होत नसल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत.
देवरुख रुग्णालय ‘प्रभारीं’वरच!
By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST