कणकवली : मुंबई ते गोवा जलवाहतुक आणि कोकण पट्ट्यातील बंदरांचा विकास होण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोकणाला लाभलेल्या सागरकिनाऱ्याचा समग्र विकास होण्यासाठी यासंबंधी जनमानसातून चर्चा घडविण्यासाठी विजयदुर्ग येथे १८ आॅगस्ट रोजी सागरी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. सिंधुभूमी फाऊंडेशन व कोकण क्लबच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद विजयदुर्ग येथील एमटीडीसीच्या सभागृहात होणार आहे. या परिषदेत राज्याचे माजी मुख्य सचिव अरूण बोंगीरवार, गुजरात बंदर विकासातील तज्ञ कॅ. यतीन देऊळकर, कॅ. दिलीप भाटकर, कुवेत कोकण सेवा मंचाचे इक्बाल वणू, मुंबई चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, बंदर उद्योग तज्ज्ञ इंद्रजित सावंत सहभागी होणार आहेत. कोकणातील बंदरांचा विकास, मुंबई-गोवा जलवाहतूक या विषयांवर चर्चा होणार आहे. आमदार जठार म्हणाले, सिंधुदुर्गच्या सागरी किनारपट्टीच्या विकासासाठी विस्तृत आराखडा शासकीय पातळीवरून करण्यात यावा यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेऊन पत्र दिले. गडकरी यांनी जेएनपीटीला आराखडा तयार करण्यासाठी निर्देश दिले. तसेच अतिरीक्त सचिवाकडे ही जबाबदारी दिली. बंदर विकास आणि जलवाहतुकीसाठी मुलभूत सोयीसुविधा शासनाकडून पुरवल्या जातील, असे आश्वासनही दिल्याचे जठार यांनी सांगितले. १८ रोजी १२ वाजता खासदार राऊत यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. ज्यांना बंदर विकास आणि जलवाहतुकीसंदर्भात आपल्या सूचना मांडायच्या असतील, अशांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जठार यांनी केले. (प्रतिनिधी)१८ ला वर्ल्ड हेलियम डे१८ आॅगस्ट रोजी वर्ल्ड हेलियम डे विजयदुर्ग येथे साजरा करण्यात येणार आहे. गेली सात वर्षे विजयदुर्ग येथे हा दिवस साजरा करण्यात येत आहे. सकाळी १० वाजता खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा करण्यात येईल, अशी माहिती आमदार जठार यांनी दिली.
विस्तृत आराखडा करा जलवाहतूक मंत्र्यांचे निर्देश :
By admin | Updated: August 13, 2014 23:40 IST