कणकवली : फोंडाघाट हवेलीनगर येथील संदीप लक्ष्मण हुंबे (वय १९) या ताप येत असलेल्या रुग्णाच्या रक्त नमुन्याची स्पॉट टेस्ट डेंग्यू पॉझिटीव्ह आली आहे. त्याच्यावर सध्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.मुंबई येथून फोंडाघाट येथे आलेल्या संदीप हुंबे याला चार दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते. त्याच्या रक्त नमुन्याची स्पॉट टेस्ट डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर संदीप हुंबे याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. फोंडाघाट येथे डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्यविभाग सतर्क झाला आहे. ताप येत असलेल्या रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)
फोंडाघाट येथे डेंग्यूचा रुग्ण
By admin | Updated: September 22, 2014 23:52 IST